वसईच्या भुईगाव समुद्रात एक संशयास्पद बोट आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस आणि तटरक्षक दलामार्फत बोटीची पाहणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दिवसभर ही बोट कुणाची आहे आणि का इथे आली? याची माहिती मिळाली नसल्याने सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्क कऱण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसईजवळील भुईगाव समुद्रकिनार्‍यावर गुरूवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास एक संशयास्पद बोट स्थानिकांना दिसली. या भागात बोटींचा वावर नसल्याने ही अनोळखी बोट कशी आली? याचा स्थानिक मच्छिमारांना संशय आला. ही बोट समुद्र किनार्‍यापासून दोन नॉटीकल मैल आतमध्ये आहे. बोटीवर कसलाच झेंडा किंवा निशाण नसल्याने संशयाला बळकटी मिळाली. याबाबत वसई पोलिसांना माहिती देण्यात आली. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि पाहणी सुरू केली. पोलिसांनी ड्रोन कॅमेर्‍याच्या मदतीने बोटीवरील तपासणी करण्याचा प्रयत्न केला मात्र बोटीत कुणी आढळून आले नाही. त्यामुळे तटरक्षक दल आणि महाराष्ट्र सागरी किनारा मंडळाच्या (महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड) ची मदत घेण्यात आली आहे. ही बोट संशयास्पद असून आम्ही ड्रोनच्या मदतीने हवाई पाहणी केली परंतु अद्याप बोटीबद्दल माहिती मिळाली नसल्याचे परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasai suspicious boat in bhuigaon sea alert orders to security agencies msr
First published on: 02-09-2021 at 20:32 IST