मुंबई : ‘वेदांत समूह’ आणि ‘फॉक्सकॉन’ यांच्या भागीदारीतून महाराष्ट्रात तीन टप्प्यांत १ लाख ६६ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव राज्य सरकारसमोर मांडण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या गुंतवणुकीतून २ लाख जणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळण्याचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एक आणि विदर्भातील एक अशा दोन जागांचा प्रकल्पासाठी विचार सुरू आहे. ‘फॉक्सकॉन’ने  फडणवीस सरकारच्या काळात राज्यात ३० हजार कोटींची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले होते. त्याचे कौतुकही झाले होते. पण कंपनीने नंतर पाठ फिरवली होती. यामुळे या वेळी तरी प्रत्यक्ष गुंतवणूक होण्याची राज्याच्या उच्चपदस्थांना अपेक्षा आहे.  ‘वेदांत ग्रुप’ आणि ‘फॉक्सकॉन’ कंपनीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात भेट घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे सचिव भूषण गगराणी, महाराष्ट्र  राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी.अनबलगन, फॉक्सकॉनचे वेक्टर चेन, एरिक लिन, पिव्ही लिन, वेदांतचे सतेश अम्बरडर, प्रणव कोमेरवार, एॅवनस्टारचे ग्लोबल एम.डी हेब्बर उपस्थित होते. सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले फॅब्रिकेशन उत्पादनाला राज्यात प्रोत्साहन देण्यासाठी वेदांत कंपनीस गुंतवणुकीसाठी संपूर्ण सहकार्य दिले जाईल असे आश्वासन शिंदे यांनी बैठकीत दिले. वेदांतने तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीसह भागीदारी केली असून या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये तीन टप्प्यांमध्ये प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित आहे. यात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेले डिस्प्ले फॅब्रिकेशन, ६३ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे सेमीकंडक्टर्स तसेच ३८०० कोटी रुपयांचा चाचणी प्रकल्प यांचा समावेश आहे. याबाबत एमआयडीसीशी प्राथमिक चर्चा सुरू झाली असून त्यांना पश्चिम महाराष्ट्रात तळेगाव तर विदर्भात बुटीबोरीच्या जागेचा पर्याय देण्यात आला आहे. या प्रकल्पांमधून सुमारे २ लाख जणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळेल, असे बैठकीतील सादरीकरणावेळी सांगण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vedanta group foxconn considering to invest rs 1 6 lakh cr in maharashtra zws
First published on: 27-07-2022 at 03:38 IST