नालासोपारा भागात भाजी विक्रीचा व्यवसाय करणारा सुहास कदम हा करोडपती होता होता राहिला. सुहासला गेल्या पाच वर्षांपासून लॉटरीचे तिकिट घेण्याची सवय आहे. त्याने सवयीप्रमाणे पुन्हा एकदा लॉटरीचे तिकिट काढले. त्यात त्याला १ कोटी ११ लाखांची लॉटरी लागल्याचे समजले आणि त्याला आकाश ठेंगणे राहिले. एवढी मोठी रक्कम आपण जिंकलो आहोत याचा त्याला खूप आनंद झाला. त्यानंतर तो बक्षीसाची रक्कम घेण्यासाठी लॉटरीच्या कार्यालयात गेला. तिथे त्याला सांगण्यात आले की त्याच्याकडे असलेले तिकिट बनावट आहे.

सुहास कदमने हे ऐकले आणि त्याचा यावर विश्वासच बसला नाही. त्यामुळे त्याने पुन्हा एकदा खात्री केली. तेव्हा त्याला समजले की एकूण तिघांना एकाच क्रमांकाचे लॉटरी तिकिट दिले गेले ज्यातली दोन तिकिटे बनावट होती. या दोन बनावट तिकिटांपैकी एक त्याच्याकडे आले होते. ज्या विजेत्याकडे खरे तिकिट होते त्यालाच बक्षीसाची रक्कम मिळाली.

या प्रकरणी सुहास कदमने कल्याण येथील महात्मा फुले पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार नोंदवली आहे. वाशी येथील राज्य लॉटरी विभागातही सुहास गेला होता तिथेही त्याला हे तिकिट बनावट असल्याचे सांगण्यात आले. ज्यानंतर त्याची खात्री पटली आणि त्याने पोलिसात तक्रार दिली. अधिकृत लॉटरी तिकिटांवर बारकोड असतो जो कॉपी केला जाऊ शकत नाही. तरीही बनावट तिकिटे तयार करून विकली जातात आणि लोक त्या तिकिटांना भुलतात असे लॉटरी विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी आता कल्याण पोलीस पुढील तपास करत आहेत.