उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी पत्रकार हल्ला प्रतिबंधक कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला असून विविध पत्रकार संघटनांशी चर्चा करुन या मसुद्याला लवकरच अंतिम रुप देऊन हा कायदा लवकरात लवकर केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे सह्याद्री अतिथीगृहात आयोजित केलेल्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्काराने ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री डॉ. मुजफ्फर हुसेन यांना गौरविण्यात आले. ‘लोकसत्ता’चे मुंबईतील विशेष प्रतिनिधी संजय कृष्णा बापट यांना आचार्य अत्रे. तर नाशिकच्या वरिष्ठ वार्ताहर चारुशीला सुभाष कुलकर्णी यांना दादासाहेब पोतनीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे राज्यभरातील १७ पत्रकारांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. माहिती व जनसंपर्क विभागाच्या सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर, महासंचालक चंद्रशेखर ओक, संचालक (वृत्त व जनसंपर्क) शिवाजी मानकर उपस्थित होते.पत्रकार हल्ला प्रतिबंधक कायदा लागू करण्यासह पत्रकारांच्या पेन्शन योजनेबाबतही शासन सकारात्मक आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, विविध विकासात्मक कामे माध्यमांतूनच जनतेपर्यंत पोहोचतात. जलयुक्त शिवार योजना माध्यमांच्या सहकार्यानेच यशस्वी होऊ शकली. त्यामुळे स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या जनजागृतीसाठी लिखाण करणाऱ्या पत्रकारांसाठी यावर्षीपासून विशेष पुरस्कार देण्यात येतील. आरोग्य वीम्याबाबत नवीन करार करताना त्यात जास्तीत जास्त पत्रकारांचा समावेश करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांकडे बातमीची मालकी अर्थात जबाबदारी असते. तशाच प्रकारची जबाबदारी सोशल मीडियामध्ये यावी व जबाबदारीची जाणीव ठेवून सकारात्मक दृष्टिकोनातून सोशल मीडियाचा वापर व्हावा या उद्देशाने शासनाने सोशल मीडियात लिखाण करणाऱ्यांसाठी पुरस्कार देण्याची योजना आखली. मुख्य प्रवाहातील माध्यमांप्रमाणेच सोशल मीडियाही जबाबदार व्हावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
लोकमान्य टिळक यांच्यासारख्या महापुरुषाच्या नावाने पुरस्कार मिळणे हा माझा मोठा गौरव आहे, अशी भावना श्री. हुसेन यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, महाराष्ट्र हे राज्य विविध बोलींनी समृद्ध आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने मिळालेला हा पुरस्कार सरस्वतीमातेचा प्रसाद आहे, असे मी मानतो. प्रारंभी महासंचालक ओक यांनी प्रास्ताविक केले तर पुरस्कार विजेत्या पत्रकारांच्या वतीने संजय बापट यांनी मनोगत व्यक्त केले. संचालक शिवाजी मानकर यांनी आभार मानले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Very soon law will implement against journalist attack
First published on: 04-12-2015 at 03:18 IST