‘आयडिया एक्स्चेंज’मध्ये व्हाइस अ‍ॅडमिरल गिरीश लुथरा यांचे स्पष्टीकरण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : मुंबईच्या विकास प्रकल्पांमध्ये नौदलाने कधीही आडकाठी आणली नसून याउलट त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या तातडीने देण्यात आल्या आहेत. नौदल अधिकाऱ्यांच्या घरांचा प्रश्न महत्त्वाचा असून अधिकाऱ्यांच्या निवासासाठी जागेची कमतरता भासत असल्याचे मत नौदलाच्या पश्चिम कमांडचे प्रमुख व्हाइस अ‍ॅडमिरल गिरीश लुथरा यांनी व्यक्त केले. ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ आयोजित ‘आयडिया एक्स्चेंज’ या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी त्यांनी नौदलाकडे असलेली अपुरी युद्घसामग्री, मुंबईतील नौदलाच्या जागेवर झालेले अतिक्रमण, नौदल अधिकाऱ्यांच्या वसाहतींचा प्रश्न, सागरी हद्द सुरक्षा आणि मुंबईतील विकास प्रकल्पांना परवानग्या या विषयांवर भाष्य केले.

नौदलाने गेल्या काही वर्षांत केलेली प्रगती, दलासमोर असलेल्या समस्या त्यांनी या वेळी कथन केल्या. आशिया खंडातील अनेक देश विकासाच्या मार्गावर असल्याने व्यापारासाठी मोठय़ा प्रमाणात सागरी मार्गाचा वापर वाढला आहे. त्यामुळे या सागरी मार्गावर होणाऱ्या अवैध जलवाहतुकीवर बारीक लक्ष ठेवावे लागत असल्याचे लुथरा यांनी सांगितले. मुंबईतील नौदलाच्या मुख्य तळावर पडणारा भार लक्षात घेता कारवार येथे दुसरा तळ उभारण्यास सुरु वात झाली आहे. या तळाच्या बांधकामासाठी सुमारे १९,६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या ठिकाणी २२ जहाजे बांधण्याची आणि नौदलाची ३२ विमाने उभी करण्याची क्षमता असल्याची माहिती लुथरा यांनी या वेळी दिली.

नौदलाकडे युद्धसामग्रीची कमतरता आहे. जहाजबांधणीसाठी नौदल आता पूर्णपणे समर्थ असले तरी पाणबुडीबांधणीच्या प्रकल्पाला खीळ बसली आहे. पाणबुडय़ा जुन्या असल्याने त्यांना हाताळणे कठीण झाले आहे. त्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे लुथरा म्हणाले. तसेच हेलिकॉप्टर आणि जहाज यांची खरेदी आणि बांधणीला प्राधान्य आहे. मात्र पाणबुडीबांधणीच्या प्रकल्पाची गती मंदावल्याचे त्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vice admiral girish luthra in loksatta idea exchange
First published on: 16-07-2018 at 02:06 IST