मुंबई : आयसीआयसीआय बँक कर्ज घोटाळय़ाप्रकरणी बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक केल्यानंतर व्हिडीओकॉन समूहाचे संस्थापक वेणूगोपाल धूत यांना सीबीआयने सोमवारी मुंबईतून अटक केली. या तिघांना विशेषकरून चंदा कोचर आणि धूत यांना समोरासमोर बसवून चौकशी करायची असल्याचे सीबीआयने सांगितल्यावर विशेष न्यायालयाने तिघांना तीन दिवसांची म्हणजेच २८ डिसेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली.

चंदा आणि दीपक कोचर यांना सीबीआयने शुक्रवारी दिल्लीतून अटक केली होती. त्यानंतर त्यांना मुंबईतील विशेष न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी सुनावली होती. त्यांची कोठडीची मुदत संपल्याने त्यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार होते. तत्पूर्वी, काही तास आधी सीबीआयने धूत यांची चौकशी केली आणि त्यानंतर अटक केली. तिघांना विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले. बँकेकडून व्हिडिओकॉनला सहा कर्जे मंजूर करण्यात आली होती, त्यापैकी दोन कर्जे चंदा कोचर यांचा समावेश असलेल्या बँकेच्या कर्ज मंजुरी समितीने मंजूर केली होती, असे सीबीआयतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. ‘न्यू पॉवर’मध्ये दीपक कोचर आणि धूत यांची ५०-५० टक्के भागीदारी होती. दीपक कोटर यांना या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक करण्यात आले होते. त्यानंतर धूत यांनी या कंपनीचे संचालकपद सोडले. धूत यांनी २४ हजार ९९९ समभाग न्यू पॉवरला हस्तांतरीत केले होते. दीपक कोचर यांना व्हिडिओकॉनने सहाय्य करावे यासाठी हे कर्ज देण्यात आले, असेही सीबीआयने आरोपींची कोठडी मागताना न्यायालयात सांगितले. 

‘चौकशीला टाळाटाळ’

धूत हे या प्रकरणातील मुख्य लाभार्थी असून ते चौकशीला टाळत होते, असा दावा सीबीआयने त्यांच्या कोठडीची मागणी करताना केला. धूत यांना २३ डिसेंबर रोजी पहिली नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर २५ डिसेंबर रोजी दुसरी नोटीस बजावण्यात आली, परंतु ते चौकशीसाठी काही आले नाहीत. अटकेपूर्वी केलेल्या चौकशीदरम्यानही त्यांच्या उत्तरात अनेक विसंगती होत्या. परिणामी, त्यांना अटक करण्यात आली, असेही सीबीआयतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले.

‘कारवाई बेकायदा’

धूत यांची अटक बेकायदा असून, त्यांना कोठडी सुनावली जाऊ नये, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली. धूत यांना अंतरिम जामीन मंजूर करण्याची विनंती त्यांच्या वकिलांनी केली.