पीएमसी बँकेच्या खातेदारांचा मतदानावर बहिष्कार ; तर मतदार यादीतून नावे वगळ्याने माहुलवासीय मतदानापासून वंचित

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घाटकोपर परिसरातून माहुलमध्ये स्थलांतरित केलेल्या तब्बल १६०० प्रकल्पबाधितांची मतदार यादीतून नावे वगळण्यात आल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले. तर पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांनीही पैसे मिळण्याबाबत सरकारकडून ठोस आश्वासन मिळत नसल्याने थेट मतदानावर बहिष्कार घातला. त्याचबरोबर मतदान करू नका, असे आवाहन करणारे फलक घेऊन हे खातेदार मतदान केंद्राच्या बाहेर उभे होते. तर सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेवर र्निबध येऊन वर्ष लोटूनही खातेदारांना त्यांच्या ठेवी परत मिळत नसल्याने त्यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात रोष व्यक्त करत मतदानाचा हक्क बजावला.

विद्याविहार येथील तानसा जलवाहिनीलगत राहणाऱ्या रहिवाशांना पालिकेने माहुल येथे स्थलांतरित केले होते. मात्र माहुलमधील प्रदूषणामुळे रहिवाशांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे माहुलमधून दुसरीकडे स्थलांतरित करावे, अशी मागणी करत या रहिवाशांनी न्यायालयात धाव घेतली होती. प्रकरण न्यायालयात असल्याने या रहिवाशांनी विद्याविहार येथील मूळ पत्त्यावरील मतदार यादीतून आपली नावे वगळलेली नाहीत. त्याचबरोबर उच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत त्यांची नावे घाटकोपर पूर्व मतदारसंघातून वगळू नयेत, अशी विनंती मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना केली होती. मात्र मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी त्यांची विनंती मान्य केली नाही. त्याविरोधात उपजिल्हाधिकाऱ्यांकडेही प्रकल्पग्रस्तांनी धाव घेतली होती. मात्र तेथेही त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी, मतदार यादीतून नावे वगळण्यात आल्याने माहुलमधील सुमारे १६०० रहिवाशांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागले.

पीएमसी बँकेतील घोटाळा समोर आल्यानंतर रिझव्‍‌र्ह बँकेने तिच्यावर र्निबध लादले आहेत. परिणामी, खातेदारांना बँकेतून पैसे काढता येत नाही. मुलुंडमधील अनेक मतदान केंद्रांवर पीएमसी बँकेच्या खातेदारांनी नाराजी व्यक्त केली. अनेकांनी मतदानावर बहिष्कार टाकला. काही केंद्रांबाहेर खातेदार मतदान न करण्याचे फलक घेऊन उभे होते. ‘मतदान करणार नाही आणि केल्यास ‘नोटा’चा वापर केला जाईल,’ असे या मतदारांनी सांगितले. ‘आम्ही लगेच

पैसेही मागितले नव्हते. रिझव्‍‌र्ह बँकेकडे आम्ही सगळे पैसे परत मिळतील याची हमी मागितली होती. मात्र अजूनही ती मिळालेली नाही,’ असे बोनी लाल यांनीसांगितले. आमच्यासाठी यंदाची दिवाळी काळी आहे. त्यामुळे आम्ही मत का द्यायचे,’ असा प्रश्न जगजीत सिंग यांनी उपस्थित केला.

नावे वगळल्या गैरसोय

मतदार यादीतून नावे वगळू नयेत अशी विनंती मतदार नोंदणी अधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांना केली होती. माहुलवासीयांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून खटल्याचा निकाल येईपर्यंत रहिवाशांची नावे जुन्या ठिकाणच्या मतदार यादीतून वगळू नयेत, अशी विनंती करण्यात आली होती. मात्र त्यांनी आमची विनंती अमान्य केली. माहुल येथील निवासी पत्त्याच्या आधारे नावे मतदार यादीत सामाविष्ट करण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र माहुलमध्ये प्रचंड प्रदूषण असून आमच्यापैकी कोणालाही तेथे राहायचे नाही. त्यामुळे आम्ही येथे मतदार नोंदणी केली नाही. जुन्या ठिकाणच्या यादीतून आमची नावे वगळण्यात आल्याने आता आम्हाला मतदान करता येणार नाही, असे माहुल येथील रहिवासी अनिता ढोले यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidhan sabha election mumbai pmc bank akp
First published on: 22-10-2019 at 01:03 IST