मुंबईला पाणीपुरवठा करणारे तुळशी, तानसा आणि मोडक सागर ओसंडून वाहू लागल्यानंतर आता विहार तलावही काठोकाठ भरला आहे. पावसाने असाच ताल कायम धरला तर सोमवारी विहार ओसंडून वाहू लागेल, असा विश्वास पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील जलसाठा समाधानकारक असून रविवारी सकाळी ६ वाजता उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार तलावांमध्ये १० लाख ११ हजार ३०६ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध आहे. गतवर्षी याच दिवशी तलावांमध्ये ३ लाख ३५ हजार ४४६ दशलक्ष लिटर साठा होता. ही आकडेवारी पाहता पुढील वर्षी मुबलक पाणी उपलब्ध होईल, अशी आशा मुंबईकरांकडून व्यक्त होत आहे. विहार तलाव क्षेत्रातील पूर्ण साठा पातळीसाठी केवळ ०.४७ मीटर क्षेत्र शिल्लक असून लवकरच हा तलावही ओसंडून वाहू लागेल. पावसाचा असाच जोर कायम राहिला तर पुढील आठवडय़ात अप्पर वैतरणाही दुथडी भरुन वाहू लागेल, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.
तलावांतील जलपातळी
वर्ष    पातळी(दशलक्ष लीटर)
२०१३    १०,११,३०६
२०१२    ३,३५,४४६
२०११    ५,६७,२६४
२०१०    २,३३,४१६