अभिनेते विक्रम गोखले यांची भावना
अभिनेते विक्रम गोखले यांनी आमिर खान याच्या वक्तव्याच्या निमित्ताने पुन्हा सुरू झालेल्या सहिष्णुता-असहिष्णुता वादावर ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाच्या कार्यक्रमात भाष्य केले. ते म्हणाले की, एकीकडे ‘ने मजसी ने परत मातृभूमीला..’ अशी आर्त साद घालणाऱ्या सावरकरांचा वारसा आपल्याला लाभलेला आहे; तर दुसरीकडे या देशात जन्म घेतलेला आमिर खान याच देशात जन्मलेल्या त्याच्या बायकोसह देश सोडून जाण्याची भाषा करत आहे. देशात असहिष्णुता पसरल्याचे त्याने प्रसारमाध्यमांसमोर सांगितले. हे अत्यंत चुकीचे आहे. माझा कोणत्याही सरकारशी संबंध नाही. माझा माणसांशी संबंध आहे, मी जनतेचे देणे लागतो. त्यामुळे गेल्या काही महिन्यांत मोजक्या विचारवंतांकडून होत असलेल्या कृतीचा निषेध करावासा वाटतो, असेही ते म्हणाले. त्यांनी पुरस्कार परत केले ते बरेच झाले. चुकीच्या माणसांना पुरस्कार मिळाले होते, ते परत आले, अशा शब्दांत त्यांनी पुरस्कार परत केलेल्या कलावंत-साहित्यिकांवर खोचक टीका केली.
या स्नेहमेळाव्यात राज्यभरात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी एकत्र आले आहेत. माणसांना एकमेकांशी जोडण्याचे काम येथे अविरत सुरू असताना असहिष्णुता कुठे दिसते, असा प्रश्न उपस्थित करतानाच, या संस्थांना प्रकाशात आणण्याचे ‘लोकसत्ता’चे काम सुरू राहो आणि लोकांनी दिलेल्या या निधीचा योग्य वापर होवो, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.
आनंदवनचे कौस्तुभ आमटे यांचेही या वेळी भाषण झाले. ते म्हणाले की, दु:खी लोकांचे कण्हणे ज्यांना समजते अशा लोकांनी समाजात अविरत काम सुरू ठेवले आहे. माध्यमांचा कोलाहल, अजूनही वयात न आलेली समाजमाध्यमे यात न पडता सामाजिक संस्थांनी दमदार कार्य सुरू ठेवावे आणि काळ्या ढगाला सोनेरी किनार असते हे दाखवून द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नाशिकच्या घरकुल संस्थेच्या विद्या कुलकर्णी म्हणाल्या की, ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमातून संस्थांना आर्थिक पाठबळ तर मिळालेच, पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे चांगली माणसेही संस्थेशी जोडली गेली. ‘लोकसत्ता’चे कौतुक अशासाठीही की त्यात छापून आलेल्या माहितीवर पूर्ण विश्वास ठेवून आमची संस्थाही न पाहता वाचकांनी आम्हाला भरभरून मदत केली. यातूनच आम्हाला प्रोत्साहन मिळाले, ऊर्जा मिळाली.