महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक, कला, आरोग्य तसेच शिक्षण क्षेत्रांत आपल्या अविश्रांत कार्याने प्रकाशवाटा दाखवणाऱ्या ५१ संस्थांच्या सेवाभावी प्रतिनिधींचा स्नेहमेळावा, या सेवाव्रती संस्था-व्यक्तींची परिचय कहाणी सांगणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन अन् ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाच्या यंदाच्या पाचव्या पर्वातील दहा संस्थांना वाचकांनी भरभरून दिलेला निधी प्रदान करण्याची कृतार्थता.. ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाच्या पाचव्या पर्वाची सांगता आज एका अनोख्या सोहळ्याने मुंबईत होत आहे.
‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमातून गणेशोत्सवाच्या मंगलपर्वादरम्यान गेल्या पाच वर्षांपासून प्रामुख्याने समाजातील वंचितांसाठी सेवाभावनेने कार्य करणाऱ्या संस्थांचा परिचय करून देण्यात येतो. याशिवाय कला, वाचन, संस्कृती आदीमध्ये लोकांची रुची वाढावी यासाठी संस्थात्मक कार्य उभे करणाऱ्यांची ओळखही करून देण्यात आली. या सेवाव्रतींच्या कार्याला उभारी मिळावी म्हणून वाचकांच्या साहय़ाने दानयज्ञ भरविण्यात येतो. यंदाचे या उपक्रमाचे पाचवे वर्ष. या कालावधीमध्ये समाजातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या अशा ५१ सामाजिक संस्था आणि समाजात सकारात्मक काही घडते त्यात आपलाही वाटा असावा असे वाटणारे लक्षावधी वाचक यांच्यात दानरूपी सेतू उभारण्याचे काम ‘लोकसत्ता’ने केले आहे. यंदा या संस्थांच्या स्नेहमीलनाचा तसेच या वर्षी प्रसिद्ध करण्यात आलेल्या संस्थांना मिळालेल्या धनादेशाच्या वितरणाचा सोहळा आज( मंगळवार २४ नोव्हेंबर) रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. दादरच्या सावरकर सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमास आपल्या सामाजिक जाणिवेसाठी ओळखले जाणारे सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते धनादेशांचे वाटप करण्यात येणार आहे. या वेळी ‘लोकसत्ता ग्रंथमाले’तील ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे.

पुस्तकाचे आज प्रकाशन
‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमात गेल्या पाच वर्षांत सहभाग असलेल्या ५१ संस्था-व्यक्तींचा पुनर्परिचय करून देण्याच्या उद्देशाने पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या शीर्षकानेच या पुस्तकाचे प्रकाशनही मंगळवारी होणाऱ्या स्नेहमेळाव्यात करण्यात येणार आहे. ‘लोकसत्ता ग्रंथमाले’तील या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशक आहेत पुण्यातील डायमंड पब्लिकेशन्स. कार्यक्रमाच्या ठिकाणी हे पुस्तक सवलतीच्या दरात उपलब्ध असेल.

धनादेश वितरण, स्नेहमेळावा
व पुस्तक प्रकाशन सोहळा
प्रमुख पाहुणे : विक्रम गोखले
कुठे : सावरकर सभागृह, दादर (प.)
कधी : आज (२४ नोव्हेंबर)
केव्हा : सायंकाळी ५ वाजता
प्रवेशासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य संस्था प्रतिनिधींनी कृपया अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क साधावा विनय उपासनी ९८२१६७७०२५