राज्यात महिला व सामान्य माणसाच्या सुरक्षेसाठी पोलिस कमी पडतात, असे विधान गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केल्यानंतर आपल्या सुरक्षा व्यवस्थेतील १० पोलिसांपैकी आठ पोलीस कमी करून त्यांना सर्वसामान्य माणसांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्याची विनंती विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांना केली आहे.
महिलांवरील अत्याचार, युवतींवर हल्ले, बालकांचे अपहरण असे गुन्हे वाढले असून सर्व वयोगटातील महिला असुरक्षित असल्याचे चित्र आहे. तशात महिला व सामान्य माणसाच्या सुरक्षेत पोलिसांना अपयश का येते, असा सवाल विचारल्यावर पोलिसांची संख्या कमी असल्याचे कारण राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील सांगतात. अशावेळी विधान परिषदेचा विरोधी पक्षनेते म्हणून १० पोलिसांची सुरक्षा ठेवण्याचा मला अधिकार नाही, असे तावडे यांनी पोलिस आयुक्त सत्यपाल सिंग यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.