|| संदीप आचार्य / निशांत सरवणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विश्वास पाटील प्रकरणी प्राधिकरणाच्या समितीतील सदस्यांची माहिती

सेवानिवृतीच्या शेवटच्या दिवसांत असंख्य फायली निकालात काढल्यामुळे अडचणीत आलेले झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांच्या काळातील ३३ पैकी अनेक प्रकरणांतील अनियमितता फौजदारी स्वरुपाची असल्यामुळे या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत प्राधिकरणाने नियुक्त केलेल्या समितीतील सदस्यांचे म्हणणे आहे. आता उच्चस्तरीय समिती कारवाई करणार असल्यामुळे हा अहवाल व त्याअनुषंगाने केलेल्या चौकशीचा तपशील या समितीकडे सुपूर्द केला जाईल, असेही या सदस्यांनी सांगितले.

या समितीने मूळ अहवाल सप्टेंबर २०१७ मध्ये दिला होता. या प्रत्येक प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची कार्यवाही सुरू असतानाच त्यांच्याकडील चौकशी आता काढून घेण्यात आली आहे. गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय समिती आता विश्वास पाटील यांचे भवितव्य निश्चित करणार आहे. या प्रकरणात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असून मध्यस्थी म्हणून वावरणाऱ्या विलेपार्ले येतील वास्तुरचनाकारालाही चौकशीसाठी पाचारण केल्यास घोटाळा लगेच उघड होईल, असेही या सदस्यांचे म्हणणे आहे.

१३७ पैकी ३३ प्रकरणांत गंभीर अनियमितता असल्याचा अहवाल प्राधिकरणातील समितीने दिला होता. त्यानुसार आता प्रत्येक प्रकरण उच्चस्तरीय समिती पुन्हा तपासणार आहे. विश्वास पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी तसेच विकासकांना बाजू मांडण्याची संधी दिल्यानंतर ही समिती आपला पुढील अहवाल सादर करणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

या झोपु योजनांमध्ये गंभीर अनियमितता

राधेय, मजास, जोगेश्वरी (पंखी डेव्हलपर्स) – १० हजार चौरस फूट जादा टीडीआरची खैरात; महाशिवशक्ती, न्यू लिंक रोड, लालजीपाडा (श्री साईनाथ बिल्डर्स) – भूखंड संपादन नसतानाही झोपु योजनेला चटईक्षेत्रफळासह तात्पुरती परवानगी; न्यू गौतम नगर पार्ट वन, गोवंडी (लकडावाला डेव्हलपर्स) – झोपडपट्टी घोषित नसतानाही योजना मंजूर, ७० टक्के संमतीची अटही शिथील; लिली अपार्टमेंट (विनस्माईल इन्फ्रास्ट्रक्चर) – २६ हजार चौरस फूट जादा टीडीआर; साफल्य आणि साईकृपा, ओम साईकृपा आणि साईश्रद्धा, आकुर्र्ली (शिवम डेव्हलपर्स) – चटईक्षेत्रफळाचा विचार न करता ३०५ ऐवजी ६१० पार्किंग संमती, दोनऐवजी फक्त एकाच शाळेचे पुनर्वसन आदी; प्रेमनगर, विलेपार्ले (सिगशिया कन्स्ट्रक्शन) – आरक्षित भूखंड असतानाही झोपु योजनेला मंजुरी; बालाजी, गुंदवली, अंधेरी पूर्व (चिंतामणी रिएलिटी) – पात्रता यादी प्रमाणित नसतानाही चार इतके चटईक्षेत्रफळ अदा;  रेहमत अँड शाहिद अब्दुल हमीद, वडाळा पूर्व (मेहक डेव्हलपर्स)- चार इतके चटईक्षेत्रफळ. ८१ हजार चौरस फुटाचे विक्रीचे क्षेत्रफळ मंजूर; गोम्स टाऊन – ए, कुर्ला पश्चिम (हरी ओम कन्स्ट्रक्शन), चार चटईक्षेत्रफळाची खिरापत; डायमंड महाराष्ट्र कॉम्प्लेक्स, कुर्ला (एन. के. कन्स्ट्रक्शन); नागराज, घाटकोपर (विनीत बिल्डकॉन) – विकासकाला सोसायटीने काढून टाकलेले असतानाही नियमित केले व झोपडय़ांची घनता वाढल्याचे दाखवून चार इतके चटईक्षेत्रफळ; सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, लाल डोंगर, कुर्ला (मा आशापुरा डेव्हलपर्स) – अपात्र झोपडीधारकांविना झोपडय़ांची घनता निश्चित करून चार इतके चटईक्षेत्रफळ.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vishwas patil scam
First published on: 13-07-2018 at 01:45 IST