अभियांत्रिकी उच्चशिक्षणसाठी देशात सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या मुंबईच्या ‘इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी) या केंद्रीय शिक्षण संस्थेचे पवई येथील संकुल पाण्याच्या उपलब्धतेबाबतही तितकेच संपन्न आहे. सामान्य मुंबईकर सरासरी २६८ लिटर पाणी दररोज वापरत असताना आयआयटीतील प्रत्येक व्यक्तीला दररोज तब्बल ३५८ लिटरच्या आसपास पाणी वापरण्याकरिता मिळत आहे. दरडोई वापराकरिता नेमून दिलेल्या पाण्याच्या प्रमाणापेक्षा ते कितीतरी अधिक असल्याचे आयआयटीच्या विद्यार्थ्यांनीच एका पाहणीद्वारे हे समोर आणले आहे.
त्यामुळे आयआयटीत पाण्याच्या उधळपट्टीचा मुद्दा कधी नव्हे तो ऐरणीवर आला आहे. म्हणून पाण्याचा वापर करताना संकुलात राहणाऱ्या प्रत्येकानेच स्वयंशिस्त पाळावी, अशी अपेक्षा व्यक्त होते आहे.
आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी ‘इनसाइट’ या आपल्या नियतकालिकात पाहणी व अभ्यास करून हे वास्तव समोर आणले आहे. अनिश गुप्ता, मिहिर कुलकर्णी, जीवराम कारवा, संदीप उपाध्याय, श्रीरंग जावडेकर, चैतन्य मंडुगुला, शार्थ मदान आणि वैभव भोसले या विद्यार्थ्यांच्या चमूने ही पाहणी करताना आयआयटीतील जलवाहिन्यांचा नकाशाही तयार केला आहे.
‘सेंट्रल पब्लिक हेल्थ अ‍ॅण्ड एन्व्हॉयर्नमेंट इंजिनीअरिंग ऑर्गनायझेशन’ या संस्थेने नेमून दिलेल्या निकषांनुसार घरगुती वापर असल्यास दरडोई १५० लिटर आणि कार्यालयात दरडोई ४५ लिटर इतके पाणी वापरायला मिळाले पाहिजे. मुंबईसारख्या शहरात ते यापेक्षा कितीतरी जास्त आहे. उदाहरणार्थ २०१३-१४च्या विकास आराखडय़ानुसार मुंबईत पाण्याचा वापर दरडोई २६८ लिटर इतका आहे, परंतु आयआयटीत तब्बल ३५८ लिटर दरडोई पाणी वापरले जात आहे.
येथील निवासी इमारतींमध्ये तर पाण्याचा वापर दरडोई ५१३ लिटरच्या आसपास आहे. तर विद्यार्थी वसतिगृहांमध्ये दरडोई ३६३ लिटर पाणी वापरले जाते. मुख्य प्रशासकीय इमारतीत मात्र ते दरडोई ५८ लिटर इतके आहे.
आयआयटीला महापालिकेतर्फे पाणीपुरवठा केला जातो. कॅम्पसमध्ये प्रामुख्याने चार आणि सहा लाख लिटर क्षमता असलेल्या दोन पाण्याच्या टाक्या आहेत. याशिवाय २४ बोअरवेल असून त्यांच्या माध्यमातूनही संपूर्ण संकुलाला पाणीपुरवठा होतो. या पाण्याचा वापर प्रामुख्याने बगिचे, झाडे, शौचालये, हायड्रोलिक प्रयोगशाळा आदींकरिता केला जातो. चोवीस तास पाणी उपलब्ध असल्याने तशी चंगळच आहे, परंतु पाणी उपलब्ध आहे म्हणून त्याची उधळपट्टी करणे योग्य नाही, असे पाहणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वाटते.
पाण्याच्या वापराबाबत स्वयंशिस्त यावी यासाठी त्यांनी या पाहणीत काही उपाययोजनाही सुचविल्या आहेत. आयआयटीत काही ठिकाणी पाण्याच्या पुनर्वापरासाठी प्रक्रिया करण्याची सोय आहे, परंतु हे प्रयत्न फारच तोकडे आहेत, असे या पाहणीत विद्यार्थ्यांनी नमूद केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाणी आणि विजेच्या वापराबाबत कानपूरच्या आयआयटीने केलेल्या उपयांचा दाखला देत पुढील मार्गाद्वारे पाण्याच्या वापरावर आपण मर्यादा आणू शकतो असे विद्यार्थ्यांना वाटते.
* पाण्याचा वेग कमी असणारे नळ (फिक्शर्स) वापरून ६२ टक्के पाण्याची बचत करणे.
* संकुलाच्या सौंदर्यीकरणाकरिता गवताचे मैदान, कुरणे (लॉन) तयार करण्याऐवजी स्थानिक वृक्ष, रोप आणि झुडपांची लागवड करणे. त्यामुळे पाण्यात ५० टक्के कपात होईल.
* रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये पाण्याच्या पुनर्वापराचीही सोय करून ते पाणी वापरणे.
* सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी झाडांसाठी वा बगिचांकरिता वापरणे.
* संकुलातील वृक्षांचे जतन आणि संवर्धन.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wastage of water in iit mumbai
First published on: 20-10-2015 at 02:15 IST