मुंबई : पवई येथे वैतरणा आणि उध्र्व वैतरणा या दोन मुख्य जलवाहिन्यांच्या जलजोडणीमधून शुक्रवारी सकाळी अचानक गळती सुरू झाली. त्यामुळे दिवसभर मुंबईतील काही भागांतील पाणीपुरवठय़ावर परिणाम झाला. गळती दुरुस्तीचे काम शनिवारी सकाळी पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र शनिवारीही कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

पवई येथे २४०० मिलीमीटर व्यासाची वैतरणा वाहिनी आणि २,७५० मिलीमीटरची उध्र्व वैतरणा वाहिनी यांमधील ९०० मिलीमीटर व्यासाच्या छेद जलजोडणीवर शुक्रवारी गळती सुरू झाली. पालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे गळती दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले होते. या दुरुस्तीच्या कामामुळे मलबार हिल, वरळी आणि पाली येथील जलाशयाद्वारे व माहीम येथून होणाऱ्या पाणीपुरवठय़ावर परिणाम झाला. शनिवारी सकाळपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होईल, अशी शक्यता आहे. या गळतीमुळे वरळी कोळीवाडा, पोचखानवाला मार्ग, वरळी बीडीडी चाळ, प्रभादेवी, डिलाइल मार्ग, आदर्श नगर, जनता कॉलनी, वरळी हिल मार्ग, माहीम (पश्चिम), दादर (पश्चिम), प्रभादेवी, लेडी लक्ष्मीबाई जगमोहनदास मार्ग (नेपिअन्सी रोड), भुलाभाई देसाई मार्ग, ताडदेव, रीज मार्ग, महालक्ष्मी मंदिर विभाग, एल. डी. रुपारेल मार्ग येथील पाणीपुरवठय़ावर परिणाम झाला.