आठवडाभरात दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती
केरळमध्ये पावसाचा प्रभाव वाढला असून गेले पंधरवडाभर अंदमानात धो धो बरसणारा पाऊस पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती असल्याचे केंद्रीय वेधशाळेने जाहीर केले आहे. केरळात पाऊस दाखल झाल्यानंतर साधारण आठवडाभरात तो राज्यात पोहोचतो. दोन वर्षे दुष्काळ सोसलेल्या महाराष्ट्रात सात जूनपासून सरी पडतील, तर मान्सून दहा जून रोजी दाखल होण्याचा अंदाज आहे. सध्या कार्यरत असलेल्या हवामानाच्या विविध यंत्रणाही १० जूननंतर मुंबईसह कोकणात पावसाचा प्रभाव वाढेल, असे म्हटले आहे.
यावर्षी केरळमध्ये सात जून रोजी (चार दिवसांचा फरक गृहित धरून) म्हणजे नेहमीपेक्षा आठवडाभर विलंबाने मान्सून प्रवेशणार असल्याचे वेधशाळेने जाहीर केले होते. मात्र सध्याची स्थिती पाहता मान्सूनला फारसा विलंब नसल्याचे दिसत आहे.
केरळसह कर्नाटकमध्येही पुढील तीन दिवस पावसाचे सांगितले जात असले तरी महाराष्ट्रात मात्र सात जूनपर्यंत केवळ तुरळक सरींचा अंदाज आहे. त्यानंतर आठ जून रोजी पावसाचा प्रभाव वाढणार आहे व १० जूनपासून पावसात सातत्य येणार असल्याचे हवामान अभ्यासाच्या वेगवेगळ्या प्रणालींवरून दिसत आहे.
अंदमानमध्ये १८ मे रोजी मान्सून दाखल झाला. मात्र त्यानंतर भारताच्या दक्षिण टोकाजवळ उद्भवून बंगालच्या उपसागरातून बांगला देशापर्यंत प्रवास केलेल्या वादळापायी मान्सून खोळंबला होता. केरळातील कन्नूर, अल्लापुळा, कोळीकोड, मंगळुरू अशा भागात २४ तासांत ५० ते १०० मिमी पाऊस पडला.  दरम्यान, सायंकाळी पुण्यात पावसाच्या काही सरी कोसळल्या.

मान्सून केव्हा जाहीर होतो?
केरळमधील निश्चित केलेल्या १४ हवामान केंद्रांवर सलग दोन दिवस २.५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्यास त्यानंतरच्या दिवशी मान्सून दाखल झाल्याचे जाहीर केले जाते. याशिवाय वाऱ्याचा वेग व दिशा तसेच दीर्घतरंगलांबी असलेल्या किरणोत्सर्गाचेही निकष लावले जातात. साधारण १ जून रोजी पाऊस केरळात येतो व १५ जुलैपर्यंत देशभरात पोहोचतो.