मुंबई: वातानुकूलित लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर पश्चिम रेल्वेने कठोर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. गेल्या सहा महिन्यांत ११ हजार २१६ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली. विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढतच असल्याचे कारवाईतूनही समोर आले आहे. त्यामुळे वातानुकूलित लोकलमधून विनातिकीट प्रवास टाळावा, असे आवाहन पश्चिम रेल्वेकडून करण्यात आले आहे.

पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरारदरम्यान धावणाऱ्या वातानुकूलित लोकलच्या दररोज ३२ फेऱ्या होतात. अल्प प्रतिसादामुळे ५ मेपासून वातानुकूलित लोकलच्या तिकीट दरात कपात करण्यात आली. त्यानंतर पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलला काहीसा प्रतिसाद वाढू लागला. एकीकडे वातानुकूलित लोकलमध्ये गर्दी वाढत असताना दुसरीकडे विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रमाणही वाढू लागल्याचे निदर्शनास आले आहे. काही प्रवाशांकडे वातानुकूलित लोकलचे तिकीट नसते, तर काही प्रवासी प्रथम किंवा द्वितीय श्रेणीचे तिकीट काढून बिनदिक्कत वातानुकूलित लोकलमधून प्रवास करीत असल्याचेही आढळले आहे. वातानुकूलित लोकलमध्ये सध्या तिकीट तपासनीस नाहीत. याचा गैरफायदा घेऊन काही प्रवासी वातानुकूलित लोकलमधून प्रवास करीत आहेत. त्यांच्याविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. अशा प्रवाशांकडून किमान २५० रुपये दंड आणि प्रवास भाडे वसूल करण्यात येते.

नक्की वाचा >>>> वसई-पनवेल चौपदरीकरण, हार्बर जलद उन्नत प्रकल्प टांगणीला

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते जून २०२२ या काळात वातानुकूलित लोकलमधून प्रवास करणाऱ्या ११ हजार २१६ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. जानेवारीत ७२७ विनातिकीट प्रवासी आढळले होते. एप्रिलमध्ये १ हजार ७५४ आणि जूनमध्ये २ हजार ८४७ विनातिकीट प्रवासी आढळल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली. त्यांच्याकडून एकूण ३८ लाख ६४ हजार ७२९ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. विनावातानुकूलित लोकलमधील प्रथम श्रेणीचा पास वातानुकूलित लोकल पासमध्ये रुपांतरित करण्याची मुभा रेल्वे प्रशासनाने दिली आहे. तर प्रथम श्रेणीचे तिकीट असल्यास त्यातील फरक भरून वातानुकूलित लोकलमधून प्रवासी प्रवास करता येतो.