पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरार दरम्यान येत्या वर्षभरात १७ पादचारी पूल उभारण्यात येणार असून चार रेल्वे क्रॉसिंग फाटक बंद करण्यात येणार आहेत. याने उपनगरी गाडीचा वेग वाढण्यास मदत होणार आहे.रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोअर परळ, दादर, सांताक्रूझ, अंधेरी, जोगेश्वरी, कांदिवली, बोरिवली, विरार आदी १७ ठिकाणी पादचारी पूल उभारण्यात येणार आहेत. अंधेरी ते गोरेगाव दरम्यान तीन रेल्वे क्रॉसिंग असून वांद्रे ते खार दरम्यान एक क्रॉसिंग आहे. या क्रॉसिंगमुळे उपनगरी गाडय़ांचे वेळापत्रक नेहमी कोलमडते. जोगेश्वरी ते गोरेगाव दरम्यान दोन रेल्वे उड्डाण पूल उभारण्याचे काम सुरू असून ते येत्या सप्टेंबपर्यंत पूर्ण होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. रेल्वे उड्डाण पूल सुरू झाल्यानंतर ही चारही क्रॉसिंग बंद करण्यात येणार आहेत.