पश्चिम उपनगरातील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि लोकांची गैरसोय लक्षात घेऊन ३७ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. ही सर्व ठिकाणे कायमस्वरूपी ‘फेरीवालामुक्त’ होईपर्यंत पोलिसांची कारवाई सुरूच राहील, असे पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
सांताक्रूझ पूर्व येथे फेरीवाल्यांविरुद्ध सहायक आयुक्त वसंत ढोबळे यांनी केलेल्या कारवाईला भरपूर प्रसिद्धी मिळाल्याने आपण फेरीवाले हटविण्याच्या मागे लागलेलो नाही. गेल्या दीड महिन्यापासून ही कारवाई सुरू आहे. आपल्या हद्दीतील विविध पोलीस ठाण्याच्या अंतर्गत रेल्वे स्थानके तसेच जंक्शन परिसरांची माहिती घेऊन अशा ठिकाणांची यादी तयार करण्यात आली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याला ती देण्यात आली आहे. पोलीस ठाण्यांनी आपापल्या पद्धतीने कारवाई सुरू केली आहे. जोपर्यंत संबंधित परिसर कायमस्वरूपी फेरीवाल्यांपासून मुक्त होत नाहीत, तोपर्यंत ही कारवाई सुरूच राहील, असेही नांगरे-पाटील यांनी स्पष्ट केले जात आहे.
आपण जेव्हा या परिसराचा कार्यभार स्वीकारला तेव्हा फेरीवाल्यांमुळेच विनाकारण वाहतुकीची कोंडी होत असल्याचे दिसून येत होते. तेव्हापासूनच या फेरीवाल्यांविरुद्ध कशी कारवाई करता येईल, याची आखणी केली जात होती. पालिका कर्मचाऱ्यांना आवश्यक तो बंदोबस्त देऊन ही कारवाई केली जात होती. परंतु सकाळी कारवाई केल्यानंतर सायंकाळी फेरीवाले पुन्हा हजर होत होते. त्यामुळे पोलिसांचे विशेष पथक तयार करून पुन्हा फेरीवाले येऊ नयेत, याची काळजी घेतली जात होती याकडेही नांगरे-पाटील यांनी लक्ष वेधले.
’ हे परिसर फेरीवालेमुक्त होणार!
वांद्रे-कुर्ला संकुल – मोतीलाल नगर, नेहरू नगर, सीएसटी मार्ग, पश्चिम द्रुतगती मार्ग, एमटीएनएल मार्ग जंक्शन; खेरवाडी – संत ज्ञानेश्वर मार्ग, कम्युनिट हॉल परिसर, महात्मा गांधी मार्ग; निर्मल नगर – जेसी मार्ग, गोळीबार रोड, खेरवाडी रोड परिसर; वाकोला – सांताक्रूझ पूर्व रेल्वे स्थानक मार्ग, कालिना मार्केट, आग्रीपाडा मार्ग; विलेपार्ले – महात्मा गांधी मार्ग, मोगीबाई मार्ग, हनुमान मार्ग, नेहरू मार्ग; सहार – सहार गाव, चिमटपाडा, लेलेवाडी, एके मार्ग; वांद्रे – हिल रोड, स्थानक मार्ग, टाऊन मार्केट, बाजार मार्ग, नौपाडा, गुरुनानक मार्ग, पाली हिल नाका; खार – स्थानक मार्ग, बीएमसी मार्केट, लिंकिंक रोड; सांताक्रूझ – स्थानक मार्ग, खोतवाडी, शास्त्रीनगर-चुनाभट्टी, गझदरबंध मार्ग; जुहू – इर्ला सोसायटी मार्ग, विलेपार्ले स्थानक मार्ग; डी. एन. नगर – रेल्वे स्थानक परिसर, स्वामी विवेकानंद मार्ग, जयप्रकाश मार्ग – मेट्रो पुलाच्या खाली; वर्सोवा – चारबंगला मार्केट परिसर, यारी रोड, भारत नगर गॅरेज; ओशिवरा – बेहराम बाग परिसर, आनंद नगर, शक्तीनगर, लोटस पेट्रोल पम्पच्या मागे, वैशाली नगर; आंबोली – जोगेश्वरी रेल्वे स्थानक, फाटक परिसर, फन रिपब्लिक समोरील पदपथ, न्यू लिंक रोड पदपथ; अंधेरी – गुंदवली, पिंकी टॉकीजजवळ, रेल्वे स्थानक परिसर; एमआयडीसी – सिप्झ, चर्च मार्ग; जोगेश्वरी – गुंफा मार्ग, सोसायटी मार्ग; मेघवाडी – सवरेदय नगर, मेघवाडी नाका, वांद्रे प्लॉट; साकीनाका – चांदिवली म्हाडा, मोहिली पाईपलाईन, काजूपाडा मार्केट, जंगलेश्वर मार्ग, खैरानी मार्ग, ९० फूट मार्ग; पवई – आयटीआय मेन गेट, तुंगा गाव, इंदिरा नगर.