देशात सुमारे वर्षभर पुरेल एवढी साखर असताना केंद्र सरकारने पाकिस्तानातून साखरेची आयात केली. सरकारला भारतीय शेतकरी जगवायचा आहे की, पाकिस्तानचा हे स्पष्ट करावे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पावर यांनी लगावला. भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीच्याप्रचारासाठी जाण्यापूर्वी ते नागपुरात पत्रकरांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी पवार म्हणाले की,  गेल्या वर्षी ऊसाचे उत्पादन चांगले झाल्याने देशात मोठ्या प्रमाणावर साखरेचे उत्पादन झाले आहे. देशात आणखी वर्षभर पुरेल एवढी साखर उपलब्ध आहे. ही स्थिती असताना केंद्र सरकारने पाकिस्तानमधून साखर आयात करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी गोदाम फोडल्यानंतर साखर आयात केल्याची कबुली दिली.

पाकिस्तानची साखर आयात करुन तेथील ऊस उत्पादकांना फायदा होणार आहे. देशातील ऊस उत्पादकांना वाऱ्यावर सोडायचे आणि पाकिस्तानचे शेतकरी जगवायचे, असे सरकारचेधोरण असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला.

डावखरेंचा निर्णय स्वार्थप्रेरित
राष्ट्रवादीचे आमदार निरंजन डावखरे यांनी पक्षत्याग करून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याबाबत बोलताना पवार यांनी सांगितले की, निरंजन डावखरे यांनी भाजपमध्ये जाण्यापूर्वी आपल्याशी चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी सांगितलेल्या कारणांमध्ये काही तथ्य नाही.  डावखरे यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी भाजपशी हातमिळवणी केली आहे. सत्ताधा-यांच्या विरोधात धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र येताहेत. पण, यात सन्मानपूर्वक जागावाटप झाले पाहिजे. त्यावरच पुढील गोष्टी अवलंबून असल्याचे सूचक विधान त्यांनी केले.

पेट्रोल दरवाढ नव्हे स्लो-पॉयझन
दिवसेंदिवस आभाळाला भीडणारे पेट्रोलचे दर नियंत्रणात आणण्याऐवजी केंद्रातील नेते दरवाढीच्या लंगड्या सबबी पुढे करीत आहेत. पंतप्रधानांसह दिग्गज नेते यावर सोईस्करपणे मौन बाळगून आहेत. ही दरवाढ म्हणजे स्लो-पॉयझन असल्याचा आरोप पवार यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why govt import shugar from pakistan
First published on: 24-05-2018 at 21:45 IST