चित्रपट अभिनेता संजय दत्त याची फलरे रजा वाढविण्याचा निर्णय चुकीचा किंवा बेकायदा असल्यास त्यामध्ये सरकार हस्तक्षेप करेल, अन्यथा नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. कोणी कितीही प्रभावशाली असला तरी त्याचा कोणताही फरक पडणार नाही आणि सरकार आपले काम कायद्यानुसारच करेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
शस्त्रे बाळगल्याप्रकरणी संजय दत्त पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असून त्याला १४ दिवसांच्या फलरे रजेवर तुरुंगातून सोडण्यात आले होते. ही रजा वाढविण्याची विनंती त्याने केली आहे. तुरुंगात हजारो कैदी खितपत पडले असताना त्यांना रजा दिल्या जात नाहीत आणि चित्रपट अभिनेता असल्याने संजयवर मेहेरनजर दाखविली जाते, असा आरोप होत आहे.
संजयला वारंवार रजा कशा मिळतात, असा सवाल भाजप नेते याआधी करीत होते. पण आता भाजप सरकार सत्तेवर असूनही संजयला विशेष सवलत दिली जात असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण केले आहे.
कोणालाही विशेष मेहेरनजर दाखविली जाणार नाही किंवा आकसाने कारवाई केली जाणार नाही. फलरे रजा देण्याचे, नाकारण्याचे किंवा त्यात वाढ करण्याचे अधिकार तुरुंग महानिरीक्षकांना आहेत. त्यांनी कायद्याचे पालन केले नाही, तरच सरकार हस्तक्षेप करेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.