वेस्ट इंडिजचा महान डावखुरा फलंदाज ब्रायन लारा याला मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात मंगळवारी दाखल करण्यात आले. लाराच्या छातीत दुखत असल्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. डॉ. प्रवीण कुलकर्णी यांनी ब्रायन लाराची अँजिओग्राफी केली. या चाचणीमधून लाराच्या प्रकृतीला कुठलाही धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यानंतर त्याने स्वतः आपण ठणठणीत असल्याचे सांगितले आहे.
“माझी तब्येत अगदी ठणठणीत आहे. माझ्या प्रकृतीत झटपट सुधारणा होत असून मी उद्याच डिस्चार्ज घेऊन माझ्या हॉटेलवरील रूममध्ये शिफ्ट होत आहे. माझ्या प्रकृतीत अचानक काय बिघडले अशी काळजी सगळ्यांनाच होती. कदाचित मी जिममध्ये जास्तीचा व्यायाम केला. त्यामुळे माझ्या छातीत दुखू लागले. डॉक्टर कडे जाणे हे मला इष्ट वाटले म्हणून मी रुग्णायल्यात दाखल झालो होतो. गरजेच्या सर्व चाचण्या करण्यात आल्या आहेत आणि मी सध्या झकासपैकी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामना टीव्हीवर पाहत आहे”, असे ब्रायन लाराने सांगितले. विंडीज क्रिकेट मंडळाने याबाबतचे ट्विट केले आहे.
UPDATE: Message from @BrianLara
“I am fine. I am recovering and I will be back in my hotel room tomorrow”
AUDIO ON. Click below to hear Brian’s full message:https://t.co/mWQVBkbJtj pic.twitter.com/cogFzpEjxR— Windies Cricket (@windiescricket) June 25, 2019
लाराची अँजिओग्राफी करण्यात आली. त्यात त्याला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे आता अँजिओप्लास्टीची गरज नाही. विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने ब्रायन लारा मुंबईत आला आहे.
शैलीदार डावखुऱ्या फलंदाजीसाठी ओळखला जाणारा लारा एकेकाळी वेस्ट इंडिजच्या फलंदाजीचा मुख्य आधारस्तंभ होता. लारा आता ५० वर्षांचा आहे. क्रिकेटमध्ये आता तो फारसा सक्रीय नाही. लाराने नव्वदच्या दशकात आपल्या फलंदाजीने जागतिक क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण केला होता. लाराला बाद करणे भल्या भल्या गोलंदाजांसाठी आव्हानात्मक असायचे.
फलंदाजीला मैदानावर आल्यानंतर लाराच्या बॅटमधून नेहमीच धावांचा पाऊस पडायचा. १९९० साली पाकिस्तान विरुद्ध लाहोरमध्ये त्याने वेस्ट इंडिजकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याचवर्षी कराचीमध्येही पाकिस्तान विरुद्ध त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्येही पदार्पण केले. कसोटीमध्ये १३१ सामन्यात त्याच्या नावावर ११,९५३ धावा आहेत. ४०० ही कसोटीमधील त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.
वनडेमध्ये २९९ सामन्यात त्याने १०,४०५ धावा केल्या. कसोटीमध्ये ३४ शतके ४८ अर्धशतके तर वनडेमध्ये १९ शतके आणि ६३ अर्धशतकं लाराच्या नावावर जमा आहेत. लारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळत असताना त्याची नेहमीच भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर बरोबर तुलना झाली. लारा सर्वोत्तम की सचिन ही नेहमीच क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चा व्हायची. पाकिस्तान विरुद्ध लारा २००६ साली शेवटचा कसोटी सामना खेळला.