मुंबईत ढगाळ वातावरण तापमानात वाढ होण्याची शक्यता
हवामानाने पुन्हा एकदा त्याचा लहरीपणा दाखवून दिला असून आठवडाभर निवासाला राहिलेल्या थंडीसोबत गुरुवारी ढगांनी आणि पावसाच्या शिंतोडय़ांनीही मुंबई-ठाण्यात हजेरी लावली. ढगाळ वातावरणाने मुंबईची थंडी काहीशी दूर गेली असून किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र ढग फार काळ वस्तीला राहणार नसून शुक्रवारी आकाश पुन्हा निरभ्र होणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.
मुंबईच्या वायव्येला हवेच्या वरच्या पातळीत कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्याऐवजी पश्चिमेकडून समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव अधिक वाढला. हे वारे सोबत बाष्प घेऊन येत असल्याने वातावरण ढगाळ झाले. शहरात काही ठिकाणी शिंतोडेही पडले. गुरुवारी संध्याकाळी पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांची तीव्रता कमी झाली होती. २४ तासांत आकाश पुन्हा निरभ्र होणार असल्याचा अंदाज मुंबई हवामानशास्त्र विभागाचे संचालक व्ही. के. राजीव यांनी व्यक्त केला. मात्र ढगाळ वातावरणामुळे हवेतील उष्मा वाढला आहे. शुक्रवारीही तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. उत्तर कोकण वगळता राज्याच्या उर्वरित भागात हवा कोरडी राहील. ढगाळ वातावरणानेही किमान तापमानात तीन अंश सेल्सिअसनी वाढ केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Winter and rain sprinkle
First published on: 15-02-2014 at 12:46 IST