६४ लाखांचे एमडी, चरस जप्त; १० लाखांची रोकड हस्तगत

मुंबई : किरकोळ विक्रेत्यांना अमली पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या महिलेला अमली पदार्थविरोधी पथकाने वांद्रे परिसरातून अटक केली. नजमा शेख (३५) असे या महिलेचे नाव असून तिच्याकडून सुमारे ६४ लाख रुपयांचे अमली पदार्थ आणि १० लाख रुपये रोख जप्त करण्यात आले.

अमली पदार्थविरोधी पथकाचे उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार नजमाकडे १०० ग्रॅम एमडी आणि पावणेतीन किलो चरस जप्त करण्यात आले. परराज्यांतून आणलेला चरस, गांजाचा साठा नजमा मध्यरात्री शहरातील किरकोळ विक्रेत्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम करीत होती.

पथकाच्या घाटकोपर कक्षाला नजमाबाबत नेमकी माहिती मिळाल्यावर सापळा रचून तिला अटक करण्यात आली.

अमली पदार्थ विक्रीतून नजमाने गेल्या काही वर्षांत बरीच मालमत्ता गोळा केल्याची माहिती पुढे आली असून तिचा पती अशाच एका गुन्ह्यात अटकेत आहे.

कोकेन कॅप्सूल गिळणारा परदेशी तरुण अटकेत

केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) गेल्या आठवडय़ात जुहू परिसरात कोकेन विक्रीसाठी आलेल्या एका नायजेरियन तरुणास ताब्यात घेतले. तत्पूर्वीच तोवरने कोकेन दडविलेल्या कॅप्सूल गिळल्या. या तरुणास जे.जे. रुग्णालयात आणून त्याने गिळलेल्या १२ कॅप्सूल हस्तगत करण्यात आल्या. प्रत्येक कॅप्सूलमध्ये एक ग्रॅम कोकेन आढळले. हा तरुण या कॅप्सूल तोंडात दडवून सर्वत्र फिरत होता. ग्राहकाची भेट होताच तोंडातील कॅप्सूल काढून कोकेन समोर ठेवत होता. अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई असल्याचे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी सांगितले.