मुंबईतील लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंडमधील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर गुरुवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ११ महिलांचा समावेश आहे. मुख्य म्हणजे खुशबू मेहता ही २८ वर्षीय तरुणी कमला मिलमधील रेस्तराँमध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी गेली होती. मात्र, तिचा हा खास दिवस तिच्यासाठी दुर्दैवी ठरला. या भीषण आगीत खुशबूचाही मृत्यू झाला आहे.

वाचा : आगीपासून वाचण्यासाठी बाथरुमच्या दिशेने पळाले अन् जीवाला मुकले

खुशबू तिच्या मित्रमंडळींसोबत ‘1 अबव्ह’ या रेस्तराँ पबच्या टेरेसवर वाढदिवस साजरा करत होती. त्याचवेळी ही दुर्दैवी घटना घडली. खुशबूच्या जाण्यानं मेहता कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. खुशबूचे आजोबा बाबुलाल मेहता यांनी या संपूर्ण घटनेसाठी रेस्तराँच्या मालकाला जबाबदार ठरवले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हॉटेलमध्ये मुलभूत सोयीसुद्धा नसल्याचे बाबुलाल यांचे म्हणणे आहे.

वाचा : अग्नितांडवाबद्दल मोदी आणि मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

रात्री साडेबाराच्या सुमारास ‘1 अबव्ह’ रेस्तराँमध्ये आग लागली. इमारतीच्या टेरेसवर बांबू आणि प्लास्टिकचे छप्पर असल्याने आग झपाट्याने पसरत गेली. या रेस्तराँच्या बाजूला ‘मोजोस ब्रिस्ट्रो’ पब आहे. आगीचे लोण तिथेही पोहोचले. दरम्यान, पोलिसांनी ‘१ अबव्ह’ च्या मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.