पतीच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून भांडुप येथे लेखा भारद्वाज (२३) या महिलेने गळफास लावून आत्महत्या केली. शनिवारी दुपारी साडेतीन वाजता ही घटना घडली. पोलिसांनी लेखाचा पती जितेश भारद्वाज याला अटक केलीआहे. भांडुपच्या लाल बहादूर शास्त्री रोडवर राहणाऱ्या लेखा भारद्वाज हिचा याच भागात राहणाऱ्या जितेश भारद्वाज (२३) याच्याशी प्रेमविवाह झाला होता. जितेशला दारूचे व्यसन होते. तसेच तो लेखाला सतत मारहाण करायचा. त्याने नुकतेच लेखाला माहेरी पाठवले होते. शनिवारी दुपारी तो तिच्या घरी गेला आणि तिला शिवीगाळ केली. त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या लेखाने घरातच गळफास लावून आत्महत्या केली. लेखाची आई आरती शर्मा हिने या प्रकारास जितेश जबाबदार असल्याचा आरोप करीत त्याच्या विरोधात भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. पोलिसांनी त्या तक्रारीच्या आधारे छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जितेशला अटक केली. आरोपी जितेशविरोधात यापूर्वीही मारहाणीचे तीन गुन्हे भांडुप पोलीस ठाण्यात दाखल आहेत.