मुंबई : नाटक, त्यातली पात्रे, त्यांच्यातील नातेसंबंध, विचार आणि नाटकाचा एकंदर अनुभव प्रेक्षकांच्या मनावर ठसतो. नाटककारांनी नाटकांमधून अशा स्त्रिया उभ्या केल्या, की ज्यात वरकरणी प्रत्येक स्त्रीला आपलेच प्रतिबिंब दिसेल, मात्र तरीही नाटकातल्या त्या स्त्रिया वेगळय़ा आणि चौकटीबाहेरच्या होत्या. अशाच काही वेगळय़ा, ठाम आणि चौकटीबाहेरच्या नाटकातील नायिकांच्या ‘भूमिका’ गुरुवारी प्रेक्षकांनी अनुभवल्या.
स्त्रीची वैयक्तिक भूमिका आणि विविध जबाबदाऱ्या पार पाडत असताना बदलत गेलेली ‘ती’.. तिचे विचार, तिच्या जाणिवा, असे अनेक पैलू विविध नाटय़प्रवेशांतून उलगडत सांगणारा ‘‘ती’ची भूमिका’ हा ‘लोकसत्ता’ आयोजित विशेष कार्यक्रम गुरुवारी दादर येथील शिवाजी नाटय़मंदिर येथे सादर करण्यात आला. हा नाटय़ानुभव घेण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. नायिकाप्रधान नाटकांमधील भूमिकांचे उत्कृष्ट सादरीकरण या वेळी करण्यात आले.
या कार्यक्रमातील पहिला नाटय़ानुभव महेश एलकुंचवार यांच्या ‘आत्मकथा’ नाटकातील होता. या नाटकातील अनंत राजाध्यक्ष आणि प्रज्ञा या पात्रांतील प्रसंग विभावरी देशपांडे आणि प्रमोद काळे यांनी सादर केला. त्यानंतर विजय तेंडुलकर यांच्या ‘बेबी’ नाटकातील बेबी आणि तिचे दु:ख आदिती देशपांडे यांनी सादर केले. सई परांजपे यांनी लिहिलेल्या ‘जास्वंदी’ नाटकातील एक प्रसंग सारिका नवाथे यांनी सादर केला, तर व्यंकटेश माडगूळकरांच्या ‘पती गेले गं काठेवाडी’तील प्रसंगातून स्त्रीचं चातुर्य आणि तिच्या पतिव्रतेमागचा समाजाचा दृष्टिकोन सांगणाऱ्या सरदार सर्जेराव आणि त्यांच्या पत्नीची व्यक्तिरेखा अधोक्षज कऱ्हाडे आणि भार्गवी चिरमुले यांनी साकारली. राधिका हर्षे-विद्यासागर यांनी डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या जीवनावरील प्रसंग सादर केला. चेतन दातार यांनी लिहिलेल्या ‘सावल्या’ या नाटकातील मधल्या बहिणीची म्हणजेच रेखाची भूमिका शर्वरी पाटणकर यांनी रसिकांसमोर मांडली. त्यानंतर संजय पवार यांच्या ‘ठष्ठ’ या नाटकातील सुशीलाताईचा आक्रोश मांडणारी भूमिका हेमांगी कवी यांनी सादर केली. नाटय़ानुभवाच्या अखेरीस सुप्रिया मतकरी यांनी रत्नाकर मतकरी लिखित ‘इंदिरा’ या नाटकातील प्रवेश सादर केला.
नाटकातल्या नायिका, त्यांची भूमिका, त्यांची प्रतिमा, त्यांची समाजाची चौकट मोडण्यामागचा संघर्ष, त्यामागे असणारी खळबळ कशी होती, त्या-त्या नाटककारांच्या नायिकांचा इतिहास आपल्या संयत शैलीतून मांडण्याचे काम अभिनेत्री शिल्पा तुळसकर यांनी केले. या संपूर्ण कायक्र्रमाची संहिता अभिनेत्री, लेखिका मुग्धा गोडबोले यांनी लिहिलेली होती. कार्यक्रमाचे संयोजन उत्तरा मोने यांच्या मिती क्रिएशन्सतर्फे करण्यात आले होते.
स्त्री सक्षमीकरणाचे नाटय़कृतींतून प्रतिबिंब
‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ‘‘महाराष्ट्राचा इतिहास बघितला तर त्यात महिलांच्या मोठय़ा सक्षमीकरणाची परंपरा आहे. अगदी १८८५ चे उदाहरण लक्षात घेतले तर मुंबईची एक मुलगी आपल्या पतीला तिच्या देहावरती अधिकार कोणाचा, या मुद्दय़ावर न्यायालयात आव्हान देते. या आव्हानामुळे महाराष्ट्र दुभंगतो आणि ती मुलगी आपली भूमिका त्या वेळच्या वृत्तपत्रांतून‘‘हिंदू स्त्री’ या नावाने मांडते. त्या होत्या रखमाबाई राऊत. त्याच्यामुळे देशात संमती वयाचा कायदा करावा लागला. त्यानंतर सामाजिक बदलांमध्ये स्त्रियांचा मोठा सहभाग होता. त्याचे सुयोग्य प्रतिबिंब नाटय़ कलाकृतींतून घडत होते. त्यातल्या काही नाटय़कृती आपल्यासमोर सादर व्हाव्यात, सादरीकरण केले जावे या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाची संकल्पना आखण्यात आली,’’ असे कुबेर म्हणाले. अलीकडे माध्यम आणि महिला यांचे मनोरंजनीकरण झाल्याची टीकाही कुबेर यांनी केली.
कलाकारांचा सत्कार
‘ती ची भूमिका’ सादर करणाऱ्या अभिनेत्री विभावरी देशपांडे, भार्गवी चिरमुले, राधिका हर्षे – विद्यासागर, प्रमोद काळे, अभिषेक साळवी, हेमांगी कवी, सुप्रिया मतकरी, अदिती देशपांडे, शर्वरी पाटणकर, सारिका नवाथे, अभिनेता अधोक्षज कऱ्हाडे, रोहित मावळे, संहिता लेखिका मुग्धा गोडबोले, सूत्रसंचालक शिल्पा तुळसकर यांचा सन्मान ‘एमआयडीसी’चे अभिजीत घोरपडे, ‘एनकेजीएसबी’ बँकेच्या हिमांगी नाडकर्णी, एम. के. घारे ज्वेलर्सच्या शुभा घारे, वीणा वल्र्डच्या करिश्मा गोमटे, हावरे ग्रुपच्या उज्ज्वला हावरे, ‘लोकसत्ता’चे केविन सेंटॉस व केदार वाळिंबे या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.