लोकलच्या ‘महिला विशेष’चा रौप्य महोत्सव;  प्रवाशांना गुलाबपुष्पाची भेट

महिलांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर सुरू करण्यात आलेल्या महिला विशेष लोकलला शुक्रवारी २५ वर्षे पूर्ण झाली. ५ मे,१९९२ साली फक्त महिलांसाठी असलेली पहिली महिला विशेष लोकल चर्चगेट-बोरीवली या मार्गावर धावली. या लोकलच्या रौप्यमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून महिला तिकीट तपासनीसांनी या लोकलमधील महिला प्रवाशांना गुलाबाचे फूल भेट देऊन स्वागत केले. तसेच एक शुभेच्छांचा बॅज व चॉकलेट देऊन महिला प्रवाशांचे तोंड गोड केले.

१९९२ साली विरारहून सकाळी पहिली महिला विशेष लोकल सुटली तेव्हापासून गेली पंचवीस वर्षे ही महिला विशेष लोकल रोज धावते आहे. विरार ते चर्चगेट या २८ स्थानकांदरम्यान या लोकलमध्ये लाखो महिला प्रवास करतात. गेली पंचवीस वर्षे महिला प्रवाशांच्या सुखदु:खाच्या अनेक गोष्टी या गाडीने ऐकल्या आहेत. या प्रवासात अनेक महिलांची एकमेकींशी मैत्री झाली आहे. मुंबईत ९०च्या दशकांत सकाळी लोकल पकडायची म्हणजे मोठी कसरत होती. त्यावेळी फक्त दोनच डबे महिलांसाठी राखीव होते. त्यात जीव मुठीत धरून चढावे लागत होते. त्याच वेळी महिला विशेष लोकल सुरू करावी, अशी कल्पना पुढे आली. घर-नोकरी करणाऱ्या महिलांबरोबरच भाजी विकणाऱ्या, मासे विकणाऱ्या मावशींचीही चांगलीच सोय या गाडीमुळे झाली आहे. सणवार साजरे करण्यातही या गाडय़ा नेहमी आघाडीवर राहिल्या आहेत.

कारकीर्दीला हात दिला

‘संध्याकाळी चर्चगेटहून सुटणाऱ्या विशेष गाडीमुळे दिवसभरातील धावपळीनंतर मोठा दिलासा मिळतो. या लोकलने माझ्या २२ वर्षांची कामाची कारकीर्द घडविण्यात हातभार लागला,’ अशी प्रतिक्रिया फोर्ट येथील एका बँकेत काम करणाऱ्या महिला प्रवाशाने व्यक्त केली. तर ‘गेली २५ वर्षे मी ५.३९च्या महिला विशेष लोकलने प्रवास करते आहे. आमची कामाची वेळ संध्याकाळी ५.३० संपते. त्यामुळे ही लोकल पकडण्यासाठी आमची खूपच धावपळ होते. त्यामुळे रेल्वेने या लोकलची वेळ बदलून ५.४५ करावी,’ असे मंत्रालयात काम करणाऱ्या निर्मला खोपकर या प्रवासी महिलेने सांगितले.