जयेश शिरसाट

सट्टा किंवा जुगार खेळण्याच्या पारंपरिक पद्धती मागे पडून आता हा सगळा खेळ ऑनलाइन रंगू लागला आहे. सध्या विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने ही सट्टेबाजी जोर धरत असताना यामध्ये महिलावर्गही मागे नसल्याचे दिसून येत आहे. ‘ऑनलाइन बेटिंग’चे अ‍ॅप डाऊनलोड करणाऱ्यांत महिलांचा समावेश लक्षणीय असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

देशातल्या बडय़ा बुकींनी ऑनलाइन बेटिंगसाठी विशेष अ‍ॅप सुरू केली. अ‍ॅन्ड्रॉईड फोन वापरणारा कोणीही इच्छा असल्यास हे अ‍ॅप डाऊनलोड करून सट्टेबाजी करू शकतो. सध्या क्रिकेट विश्व करंडक स्पर्धा सुरू असून हे सारे तेजीत आहेत. बुकींच्या स्थानिक दलालाकरवी आगाऊ रक्कम भरून अ‍ॅपवर खाते उघडता येते. भरलेल्या रकमेतून वापरकर्त्यांला पॉइंट मिळतात. हे पॉइंट्स म्हणजे सट्टेबाजीतील आभासी चलन आहे. नाणेफेक, धावसंख्या, विजयी संघ यावर खात्यावर जमा पॉइंट लावून सट्टा खेळला जातो. ठरावीक टप्प्यावर वापरकर्त्यांच्या खात्यावर सट्टय़ात गमावलेले, जिंकलेले आणि शिल्लक पॉइंटचा हिशोब मिळतो. ठरलेल्या दिवशी जिंकलेली रक्कम सट्टेबाजाला दिली जाते.

विश्व करंडक सुरू होण्याआधी अशा अवैध बेटिंग अ‍ॅपवर खाती उघडणाऱ्यांमध्ये महिला आघाडीवर होत्या. हा होरा अद्याप कायम आहे. बहुतांश खाती महिलांच्या नावे उघडण्यात आली. सट्टेबाजारातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ओशिवरा, लोखंडवाला, जुहू, वर्सोवा, खार, वांद्रे, सांताक्रूजसह दक्षिण मुंबईतील कुलाबा, कफपरेड आदी उच्चभ्रू भागांमधून महिलांच्या नावे मोठय़ा संख्येने ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपवर खाती उघडण्यात आली आहेत.

सट्टेबाजीत महिलांच्या वाढत्या सहभागामागे मनोरंजन आणि तथाकथित प्रतिष्ठा ही दोन कारणे असावीत, असा अंदाज आहे. तसेच पोलीस कारवाई टाळण्यासाठी दारूचे गुत्ते किंवा अमली पदार्थाचा अड्डा सर्वसाधारणपणे महिला चालवताना दिसतात. कारवाईसाठी आलेल्या पोलिसांना अशा महिलांनी स्वत:चे कपडे फाडून, आरोप करून परतावून लावल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्याप्रमाणे ऑनलाइन बेटिंगमध्ये वसुली टाळण्यासाठी सट्टा लावणाऱ्यांनी(पंटर) योजलेली ही युक्ती असावी, असा अंदाजही सट्टेबाजारातून व्यक्त होतो.

मुंबई पोलीस दलातील अधिकारी मात्र सट्टेबाजीत महिलांच्या वाढत्या सहभागाबाबत अनभिज्ञ आहेत. याआधी मुंबई पोलिसांनी ठिकठिकाणी धाडी घालून ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपद्वारे सट्टा स्वीकारणाऱ्या दलालांना अटक केली. मात्र अ‍ॅप बनवणाऱ्या किंवा सॉफ्टवेअर तयार करून ते दलालांच्या हाती देणारे मुख्य बुकी मात्र अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

ऑनलाइन बेटिंग पथ्यावर

पोलिसांच्या विविध कारवायांमधून एलसी, एलसी एक्स्चेंज, बीबीबी, मॅटाडोअर, स्काय अशा विविध नावाने चालणारी अवैध बेटिंग अ‍ॅप उजेडात आली. पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मुख्य बुकी परदेशात आहेत. पारंपरिक सट्टेबाजीपेक्षा ऑनलाइन पद्धत खूपच सुलभ आहे. बहुतांश अ‍ॅप प्रसिद्ध बेट फेअर संकेतस्थळाशी जुळलेली आहेत. तेथून भाव घेतले जातात. अ‍ॅपवर साचेबंद प्रोग्राम तयार असतो. त्यावर सुरू असलेल्या सामन्याचा हलता धावफलक असतो. सट्टेबाजी कशाकशावर करू शकता, ती माहिती असते.