अनेक अडचणींना तोंड देत पदवी प्राप्त करणाऱ्या एसएनडीटी विद्यापीठातील विद्यार्थिनी कोणतेही जागतिक आव्हान पेलू शकतील, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी व्यक्त केला.
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचा ६३ वा दीक्षांत समारंभ सोमवारी विद्यापीठाच्या पाटकर सभागृहात संपन्न झाला, यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री डी. पी. सावंत, विद्यापीठाच्या कुलगुरु प्रोफेसर वसुधा कामत, प्रकुलगुरु डॉ. वंदना चक्रवर्ती, डॉ. रोहिणी गोडबोले, विद्यापीठाच्या सिनेटचे सर्व सदस्य, अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, या विद्यापीठाने महिलांच्या उन्नतीसाठी आणि सक्षमीकरणासाठी दिलेले योगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे. विद्यापीठाचा विस्तार आता मोठ्या प्रमाणात झाला असून आजचा दीक्षांत समारंभ हा श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठातील विद्यार्थिनीच्या आयुष्यातला महत्त्वाचा आणि आयुष्याला कलाटणी देणारा आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पहिले महिला विद्यापीठ स्थापन केले. देशाचे भवितव्य अधिक उज्ज्वल करण्यासाठी आर्थिक, राजकीय याबरोबरच सामाजिक स्तरावरही महिलांना समान दर्जा मिळणे आवश्यक आहे.
राज्य शासन महिला सक्षमीकरणात अग्रेसर असून महिला धोरण जाहीर करणारे पहिले राज्य आहे. इतर राज्यांत ३३ टक्के आरक्षण असताना महाराष्ट्राने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण दिले आहे. महिलांना कमी दराने कर्ज, महिला बचत गटाची स्थापना आदी माध्यमातून त्यांचे आर्थिकदृष्ट्या सबलीकरण करण्यात येत आहे, तसेच नविन महिला धोरण अधिक व्यापक करण्यात आले असून, महिलांचा सामाजिक दर्जा सुधारण्यावर यात अधिक भर दिला आहे, असेही चव्हाण म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Womens in sndt university are capable to take challenges
First published on: 23-12-2013 at 05:11 IST