शिक्षणक्षेत्रासाठी महत्त्वाच्या घडामोडी व निर्णय होत असलेल्या काळात उच्च व तंत्रशिक्षण आणि शालेय शिक्षण विभागाचे सचिव दीर्घ रजेवर गेले आहेत. त्यामुळे दोन्ही विभागांचे कामकाज विस्कळीत होत असून उच्च व तंत्रशिक्षणाने तर सचिवांच्या अनुपस्थितीत काही फाईल्स थेट मंत्र्यांकडे तर काही फाईल्स अंमलबजावणीसाठी पाठविण्यास सुरुवात केली आहे. पुढील आठवडय़ात विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना पूर्णवेळ सचिवच नसल्याने मोठी पंचाईत होणार आहे.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव संजय कुमार तीन आठवडय़ांच्या रजेवर असून ते २२ जुलैला रुजू होतील. त्यांचा कार्यभार शालेय शिक्षण विभागाचे सचिव जे.एस. सहारिया यांच्याकडे होता. पण गेले आठवडाभर ते दौरे व अन्य कारणांमुळे उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी फारसे उपलब्ध नव्हते. आता सहारियाही गुरुवारपासून आठ दिवस रजेवर जाणार आहेत. त्यामुळे शालेय शिक्षण आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा कार्यभार अन्य अधिकाऱ्यांकडे सोपविला जाईल. पण महत्त्वाचे निर्णय, फाईल्स खोळंबल्या असून त्याचा परिणाम दैनंदिन कामकाजावर होत आहे.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाने खासगी बीएड महाविद्यालयांचे शुल्क ठरविण्यासाठी या विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली आहे. या समितीने एक महिन्यात निर्णय घेणे बंधनकारक आहे. ही समिती अस्तित्वात आली नसली तरी सचिवांना विभागाचे काम सांभाळण्यासाठी वेळ पुरत नाही. त्यात भविष्यात ते दीर्घ रजेवर असताना हे काम कसे पार पडणार, हा प्रश्न संस्थाचालकांना पडला आहे.