जगातील सर्वात लठ्ठ महिला इमान अहमदवरील उपचारांवरून मुंबईतील सैफी रुग्णालय प्रशासन आणि इमानच्या कुटुंबीयांमध्ये सुरु असलेला वाद चिघळला आहे. इमानच्या कुटुंबीयांनी आरोप केल्यानंतर नाराज झालेल्या डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करण्यास नकार दिला आहे. इमानला रुग्णालयातून सोडण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाकडून घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ५०० किलो वजन असलेल्या इमानला यावर्षी ११ फेब्रुवारीला मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. इमानचे वजन १७१ किलोपर्यंत घटले असल्याचे सोमवारी डॉक्टरांनी सांगितले होते. मात्र इमानच्या प्रकृतीत अद्यापही फारशी सुधारणा झाली नाही. ती बोलू शकत नाही आणि तिचे वजन घटल्याचा डॉक्टरांनी केलेला दावा खोटा आहे, असा आरोप इमानची बहिण शायमा सेलीम हिने केला होता. त्यानंतर डॉक्टरांनी नाराजी व्यक्त करत इमानवर उपचार करण्यास नकार दिला आहे. इमानला रुग्णालयातून सोडण्याचा निर्णयही रुग्णालयाने घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इमानच्या कुटुंबीयांनी आरोप केल्यानंतर तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकातील डॉ. अपर्णा भास्कर यांनी मंगळवारी राजीनामा दिला आहे. इमानच्या कुटुंबीयांनी आरोप केल्याने आम्ही दुखावलो आहोत, अशा शब्दांत डॉ. अपर्णा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आमच्या मुलांना सोडून आम्ही इमानसोबत अनेक दिवसांपासून राहिलो. मात्र, तिच्या कुटुंबीयांनी आरोप केल्याने आम्ही कमालीचे निराश झालो आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे. इमानचे वजन कमी झाले असून हा चमत्कारच म्हणावा लागेल. तिचे वजन कमी झाल्याचे आम्ही कागदोपत्री सिद्ध करू शकतो, असे डॉ. मुफ्फझल लकडावाला यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Worlds heaviest woman eman ahmed mumbai saifee hospital decides to discharge amid spat over treatment
First published on: 26-04-2017 at 13:34 IST