वांद्रे येथील चेतना महाविद्यालयात शनिवारी सकाळी एका तरुणीवर तिच्याच मित्राने चाकूने वार करून स्वत:ला जखमी करून घेतले. या हल्लातील जखमी तरुणी मृत्यूशी झुंज देत असून, हल्लेखोर तरुणाचे रुग्णालयात निधन झाले. प्रेमास नकार दिल्याने संतप्त झालेल्या या तरुणाने हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. महिलांवर भररस्त्यात चाकूने हल्ला होण्याची एकाच आठवडय़ातील ही चौथी घटना आहे.
वांद्रे (पू.) येथील खेरवाडीतील चेतना महाविद्यालयाच्या आवारातील व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या इमारतीत ही घटना घडली. महाविद्यालयामध्ये बीएमएसच्या तिसऱ्या वर्गात शिकणारी पायल बलसारा (२२) नेहमीप्रमाणे शनिवारी महाविद्यालयात आली होती. पायल सकाळी साडेआठच्या सुमारास पहिल्या मजल्यावरील प्रसाधनगृहातून बाहेर पडली आणि दुसऱ्या मजल्यावरील वर्गात जात होती. त्यावेळी पायरीवर उभ्या असलेल्या निखील बनकरने (२२) तिला अडवले. मात्र त्याला टाळून ती पुढे जाऊ लागली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या निखीलने चाकूने तिच्यावर वार केले. निखीलने पायलवर एकूण आठ वार केले. त्यात पायल रक्तबंबाळ होऊन खाली कोसळली. या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला. तिच्या मैत्रिणींनी आरडाओरड करताच महाविद्यालयातील कर्मचारी धावून आले. त्यांनी निखीलला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने स्वत:वर चाकूने वार केले. या दोघांना त्वरित गुरुनानक रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान दुपारी निखीलचा मृत्यू झाला, तर पायलची प्रकृती चिंताजनक आहे.
पायलचे आई-वडील मीरा रोड येथे राहात असून पायल कलिना येथे आपल्या मामाकडे राहात होती. याबाबत माहिती देताना अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले की, निखील आणि पायल दोघेही एकत्र शिकत होते आणि ते चांगले मित्र होते. पण निखीलचे पायलवर प्रेम होते. तो वारंवार तिला प्रेमासाठी आग्रह करीत होता. हा प्रकार तिने आपल्या मामांच्या कानावर घातला होता. मामांनी पोलीस ठाण्यात आणि महाविद्यालयात निखीलची तक्रारही केली होती. याबाबत निखीलच्या पालकांना समजही देण्यात आली होती. त्यानंतर पायलने निखीलशी मैत्री तोडली होती. निखील हा वांद्रे येथील सरकारी वसाहतीत राहात असून त्याचे वडील विक्री कर विभागात काम करतात. त्यांना हृदयविकाराचा त्रास असून निखीलची आजीही गंभीर आजारी आहे. निखीलला एक लहान बहीण आहे. या घटनेचे वृत्त पसरताच सरकारी वसाहतीत शोककळा पसरली. येथील रहिवाशांनी निखीलच्या इमारतीबाहेर गर्दी केली होती.
निखील असे कृत्य करेल असे कुणालाच वाटले नव्हते. या घटनेनंतर महाविद्यालयातही तणावाचे वातावरण निर्माण झाले. चेतना महाविद्यालयात तरुणाई हा महोत्सव सुरू होता. आज या महोत्सवाचा चौथा दिवस होता. या घटनेनंतर हा महोत्सव रद्द करण्यात आला. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच चेतना महाविद्यालयात पोलिसांनी ‘मिशन मृत्युंजय’ हा कार्यक्रम आयोजित करून तरुणांना गुन्हेगारीपासून दूर राहण्याबाबत मार्गदर्शन केले होते.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Dec 2012 रोजी प्रकाशित
प्रेमास नकार देणाऱ्या तरुणीवर हल्ला करून आत्महत्या
वांद्रे येथील चेतना महाविद्यालयात शनिवारी सकाळी एका तरुणीवर तिच्याच मित्राने चाकूने वार करून स्वत:ला जखमी करून घेतले. या हल्लातील जखमी तरुणी मृत्यूशी झुंज देत असून, हल्लेखोर तरुणाचे रुग्णालयात निधन झाले. प्रेमास नकार दिल्याने संतप्त झालेल्या या तरुणाने हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे.

First published on: 23-12-2012 at 04:09 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth commited socide after attacking girl who refuse to accept his love proposal