News Flash

हृदयरोग आणि गरोदरपणा

गरोदरपणात स्रीच्या शरीरात अनेक बदल होतात, त्यातला महत्त्वाचा बदल म्हणजे शरीरात रक्ताचं प्रमाण वाढतं.

गरोदरपणात स्रीच्या शरीरात जे अनेक बदल होतात, त्यातला एक महत्त्वाचा बदल म्हणजे शरीरातील रक्ताचं प्रमाण वाढतं. साहजिकच ते शुद्ध करणाऱ्या हृदयाचं कामही दुपटीनं वाढतं. त्याचा आकारही वाढतो.

गरोदरपणात स्त्रीच्या रक्ताभिसरण संस्थेत बरेच बदल होतात. शरीरात आणखी एक जीव वाढत असतो. त्याला रक्तपुरवठा व वाढीसाठी, घटक पुरविण्यासाठी शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. सर्वसाधारणपणे आपल्या शरीरात पाच  ते सहा लिटर रक्त फिरत असते, तेच गरोदरपण १० ते १२ लिटपर्यंत वाढते. ते शरीरात व्यवस्थित पोहचविण्याचे हृदयाचे काम वाढलेले असते. त्यामुळे हृदयाचे आकारमान वाढते. वाढलेले रक्त फिरवण्यासाठी हृदयाचे ठोके अधिक जोरात आणि अधिक गतीने पडतात. त्याचप्रमाणे अधिक रक्त फुफ्फुसात शुद्धीकरणाकरता पोहचते, त्यामुळे श्वासोच्छ्वास गतिमान होतो. ह्य सर्व गोष्टी गरोदरपणामध्ये हळूहळू प्रथम महिन्यापासूनच सुरू होतात. त्यामुळे शरीराला हृदयाच्या परिवर्तनाला सामोरे जाण्यास योग्य वेळ व वाव मिळतो. म्हणून स्त्रीला या गोष्टींचा सहसा त्रास होत नाही.

तिच्या वैद्यकीय तपासणीमध्ये नाडीचे ठोके वाढलेले आढळतात. श्वसनाची गती पण वाढलेली असते. रक्तदाब सहसा नॉर्मल असतो. हृदयातल्या रक्तप्रवाहाच्या घरघर असा आवाज ऐकू येतो. (HEMIC MURMUR).  श्वसनाच्या आवाजात मात्र काही दोष आढळत नाही.

हृदयाची घरघर ऐकू येण्याचे कारण की हृदयाच्या झडपातून पाच लिटरच्याऐवजी १० लिटर रक्त जास्त असल्यामुळे घरघर आवाज येतो. झडपांची साईज तीच राहते. पण त्यातून होणारा रक्तप्रवाह वाढतो. (HEMIC MURMUR). रक्ताबरोबरच शरीरात वाढलेल्या पाण्यामुळे थोडय़ा फार प्रमाणात सूज पण दिसून येते. ज्या स्त्रियांमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असेल त्यांच्यात हे बदल जास्त आढळतात.

गरोदरपणामध्ये हृदय एकदम ठणठणीत आहे की नाही हे शोधण्यासाठी ई.सी.जी. आणि एकोकार्डिओग्राफी व कलर डॉप्लर या तपासण्या आवश्यक आहेत. हृदय आलेखना (E.C.G.) मध्ये काहीच वेगळेपणा आढळत नाही. तो नॉर्मल असतो. कधी कधी हृदयाची गती वाढलेली व हृदयाचा आकारमान वाढलेले आढळते. (volume overload)

इको- कार्डिओग्राफी या तपासणीमध्ये हृदयाचे चारी कप्पे, त्यातील पडदे, चारी झडपा, दोन महारोहिण्या व्यवस्थित आहेत हे लक्षात येते. रक्ताचे प्रमाण वाढल्यामुळे हृदयाचे आकारमान वाढलेले आढळते. डॉप्लर तपासणीमध्ये हृदयाची घरघर ही फिजिऑलॉजिकल आहे, आजार नाही हे कळते.

इको-कार्डिओग्राफी ही तपासणी सोनोग्राफीसारखी असून ती आई आणि पोटातल्या बाळासाठी अत्यंत सुरक्षित आहे. त्याचा या दोघांना काहीही त्रास होत नाही.

गर्भारपणात किंवा बाळंतपणानंतर होणारा हृदयाचा आजार क्वचित आढळतो. हृदयाच्या स्नायूंना सूज येऊन हृदयाची वाढ होते व स्नायूंची कार्यक्षमता कमी होते, हृदयाची पंपिंग क्षमता कमी होते. या आजाराला वैद्यकीय भाषेत ‘डायलेटेड कार्डिओमायोपॅथी’ असे म्हणतात. हा आजार दहा हजारात एकाला आढळतो. याकरता औषधोपचार केला तर ५० ते ६० टक्के रुग्ण पूर्णपणे बरे होतात. उरलेल्या रुग्णांमध्ये हृदयक्षमता कमीच राहते व त्यांना आयुष्यभर औषधोपचाराची गरज लागते.

कधी कधी अगोदर असणारा हृदयरोग, झडपांचा आजार, मध्यम प्रमाणात असलेले, ज्याचा अगोदर कधीही त्रास झालेला नाही असे हृदयाला छिद्र असण्यासारखे आजार असतात. गरोदरपणामुळे शरीरात होणाऱ्या बदलांमुळे किंवा वाढलेल्या रक्ताच्या प्रमाणामुळे हे लपलेले आजार लक्षणे दाखवण्यास सुरुवात करतात. त्यात रुग्णाला दम लागणे, धडधड वाढणे यासारखी लक्षणे दिसून येतात.

गरोदरपणामुळे होणारे बदल लक्षात घेऊन या आजारांची उपाययोजना तज्ज्ञ डॉक्टरकडून घेणे आवश्यक आहे. यामध्ये जी उपाययोजना करतो, जे औषधोपचार करतो, त्याचे दुष्परिणाम पोटातील बाळावर होणार नाही ना याची काळजी घेणे अपरिहार्य आहे.

डॉ. गजानन रत्नपारखी – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2015 1:18 am

Web Title: heart disease and pregnancy
Next Stories
1 आहार सवयी आणि हृदयविकार
2 आहार आणि हृदयविकार – २
3 आहार आणि हृदयविकार – १
Just Now!
X