सर्वपक्षीय समिती प्रशासनाचा दावा तपासणार

नागपूर : शहरातील २४ खासगी रुग्णालयांमध्ये १८७६ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या खासगी रुग्णालयात ५७५ खाटा उपलब्ध आहेत, अशी माहिती महापालिका प्रशासनाने सोमवारी सर्वपक्षीय बैठकीत दिली. हा दावा तपसाण्यासाठी महापौरांनी स्थापन केलेली समिती उद्या, मंगळवारी अहवाल सादर करणार आहे.

सर्वपक्षीय नगरसेवकांची समितीची बैठक सोमवारी डॉ. पंजाबराव देशमुख सभाकक्षात आयोजित करण्यात आली होती. इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये १२०० खाटांची व्यवस्था आहे. जीएमसीमध्ये ६०० खाटांची असून ३४० रुग्ण भरती आहे, आयजीएमसीमध्ये ६०० खाटांची व्यवस्था असून २९५ रुग्ण भरती आहे. दोन्ही रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची व्यवस्था उपलब्ध आहे. तसेच महापालिकेद्वारा संचालित कोविड टेस्टिंग सेंटरचीसुद्धा माहिती प्रशासनाने बैठकीत दिली.

कोविड केअर सेंटरबाबत अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले की, आमदार निवास, पोलिस क्वॉर्टर पाचपावली, व्हीएनआयटी होस्टेल, सिम्बॉयसिस वसतिगृह आणि वनामतीमध्ये २८०० खाटांची व्यवस्था रुग्णांसाठी करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त ४७३० खाटांची व्यवस्था रुग्णांसाठी तयार केली आहे. ३३५६ खाटांची व्यवस्था प्रस्तावित आहे. हॉटेल्समध्येही कोविड केअर सेंटरची परवानगी  देण्यात आली आहे.

महापौरांनी सांगितले की, नागरिकांना दिलासा देण्यासाठी एन.जी.ओ.ची मदत कशी घेता येईल, याबाबत प्रशासनाने आपले मत मांडावे. करोना प्रादुर्भाव वाढत चालला आहे. रुग्णांना वाचवण्यासाठी सर्वानी समोर येण्याची गरज आहे. त्यांनी चाचण्यांची संख्या वाढवणे आणि आशा वर्कर्सना एक हजार रुपयाचे अतिरिक्त मानधन देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

बैठकीत आमदार व माजी महापौर प्रवीण दटके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, ज्येष्ठ नगरसेवक  दयाशंकर तिवारी, नगरसेवक प्रफु ल्ल गुडधे, किशोर कुमेरिया, संदीप सहारे, संजय महाकाळकर  आतिरिक्त आयुक्त जलज शर्मा उपस्थित होते.

मृत्यू नियंत्रणासाठी मेयोत स्वयंचलित यंत्रणा

जिल्हा प्रशासनाने सोमवारी  करोना मृत्यू नियंत्रणासाठी मेडिकल आणि मेयोतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठक घेतली. त्यात मेयो रुग्णालयात स्वयंचलित नियंत्रण यंत्रणा स्थापित करण्यावर एकमत झाले. या यंत्रणेमुळे अत्यवस्थ रुग्णाचे ऑक्सिजन आणि इतर काही गुंतागुंत उद्भवल्यास त्वरित संबंधित अधिकाऱ्यांसह उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या भ्रमणध्वनीवर स्वयंचलित संदेश जाईल. त्यामुळे संबंधितांवर वेळीच  लक्ष देता येईल. मेयोतील कोविड वार्डातील १०० खाटांवर स्वयंचलित नियंत्रण व्यवस्था कार्यान्वित करण्याचा निर्णय झाला. ही यंत्रणा जिल्हा प्रशासनाकडून भाडे तत्त्वावर एका कंपनीकडून मेयोत लावली जाणार आहे. त्यात रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण, रक्तदाबसह इतर माहिती संबंधित संगणकावर नित्याने अद्ययावत होत राहील. काही समस्या असल्यास डॉक्टरच्या भ्रमणध्वनीवर  संदेश जाईल.  मृत्यू कमी करण्याबाबत विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी रुग्णालायतील अधिकाऱ्यांना  सूचना करत त्यांना येणाऱ्या समस्याही जाणून घेतल्या. मेयोत यंत्रणा स्थापित होण्याच्या वृत्ताला वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवि चौहान यांनी दुजोरा दिला.

खासगी कोविड रुग्णालयांच्या मनमानीविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका

खासगी रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध नसल्याचे उत्तर  रुग्णांना देण्यात येते. यासंदर्भात प्रकाशित झालेल्या वृत्ताची दखल घेऊन उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जनहित याचिका दाखल करून घेतली. या याचिकेवर न्यायालयाने महापालिका व जिल्हा प्रशासनाला नोटीस बजावून उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. करोनाची लागण झाल्यानंतर अतिशय गंभीर रुग्णांना  रुग्णालयांमध्ये  उपचार होणे गरजेचे आहे. पण,  त्यांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात येत नाही. करोना उपचारासाठी जाहीर करण्यात आलेल्या खासगी रुग्णालयांकडून खाटा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते.  दुसरीकडे सरकारी रुग्णालयांमध्ये राजकीय पुढार्यांकडून येणार्यांना प्रथम दाखल करून घ्यावे लागते. या परिस्थितीत सामान्य व गंभीर रुग्णांना दाखल कुठे करायचे असा मोठा प्रश्न आहे. त्याशिवाय खासगी रुग्णालयांकडून लाखो रुपये खर्च करणारेच रुग्ण दाखल करून घेतले जात असल्याची बाबही समोर आली. या परिस्थितीवर प्रकाश टाकणार्या वृत्ताची उच्च न्यायालयाचे न्या. झका हक आणि न्या. अनिल किलोर यांनी दखल घेऊन जनहित याचिका दाखल करून घेतली.