शहरातील सर्वाधिक ३६; तीन वर्षांतील ६११ अपघातांत २६४ मृत्यू

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर शहरात गेल्या तीन वर्षांत  ६११ अपघातात  २६४ जणांचे मृत्यू झाले. अपघाताची वाढती  संख्या बघता प्रादेशिक परिवहन आणि पोलिसांनी संयुक्त पाहणी करून  जिल्ह्य़ातील मृत्यूला निमंत्रण देणारी ६८ स्थळे निश्चित केली आहेत. यात सर्वाधिक ३६ स्थळे शहरातील आहेत. रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने आकडेवारी समोर आली आहे.

केंद्र व राज्य शासनाकडून रस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्त प्रत्येक वर्षी मोठय़ा प्रमाणात जनजागृतीचे कार्यक्रम राबवले जातात, परंतु अद्यापही अपघातावर अपेक्षित नियंत्रण मिळाले नाही. नितीन गडकरी यांनी मंत्रीपद स्वीकारल्यावर जिल्ह्य़ातील अपघातप्रवण स्थळांवर योग्य उपाय करण्याचे जाहीर केले होते. मात्र, गेल्यावर्षी जिल्ह्य़ात केवळ नऊ स्थळांवरच उपाययोजना करण्यात आल्या. शासनाच्या आकडेवारीनुसार यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत अपघाताचे प्रमाण २४ टक्क्यांनी कमी झाल्याचे सांगण्यात येते, परंतु जिल्ह्य़ातील अनेक भागातील बेशिस्त वाहतूक, धोकादायक वळण रस्ते, मद्य प्राशन करून वाहन चालवणे, खड्डे, रस्त्यांवरील वीज खांब यासह इतर अनेक कारणांनी अपघात वाढत असून अनेक घटनांची नोंदच होत नसल्याचे नागरिक सांगतात.

गेल्या तीन वर्षांत जिल्ह्य़ात ६८ तर शहरात ३६ ठिकाणी ६११ अपघात झाले. त्यात २६४ नागरिकांचा मृत्यू झाला. प्रत्येक वाहन चालकाने नियम पाळले तर अपघात होणार नाही. धोकादायक वळणासह इतर अपघाताला कारण असलेल्या समस्या सोडवण्याकरिता आरटीओ अधिकारी विविध यंत्रणांशी चर्चा करून उपाययोजना करण्याचे प्रयत्न करीत आहे. त्यातून जिल्ह्य़ात अपघातावर नियंत्रण मिळण्याची आशा आहे.

      – शरद जिचकार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर (शहर)

रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने जिल्ह्य़ात अपघातांवर नियंत्रणासाठी आरटीओकडून विशेष मोहीम राबवली जाणार आहे. सामूहिक प्रयत्नातूनच अपघातावर पूर्णपणे नियंत्रण शक्य आहे.

      – श्रीपाद वाडेकर,

प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर (ग्रामीण)

दहापेक्षा अधिक मृत्यू झालेले अपघातस्थळे

स्थळ                अपघातांची संख्या          मृत्यू

वडधामना                  ९                            १०

आठवा मैल              १०                            १०

डोंगैरगाव                  ६                            ९

महेश धाबा               १०                          १०

चिंचभवन                 १०                         १०

झांसी राणी चौक       १०                        १०

नवीन काटोल नाका  १७                         २०

छिंदवाडा मार्ग          १३                         १३