अंगठय़ासह डोळ्यांच्या बुब्बुळाने सेकंदात ओळख पटणार; एका डॉक्टरकडून पोलिसांसह शासनाला अनोखा प्रस्ताव

वारांगणांना पोलिसांनी छापेमारी करून पकडल्यास त्या पोलिसांना खोटे वय व नावे सांगत असल्याची अनेक प्रकरणे आहेत. एकच आरोपी विविध पोलीस ठाण्यात विविध नावे व वय सांगत असल्याने त्यांची ओळखही पोलिसांना पटवता येत नाही. नागपूरच्या डॉक्टराने नवीन क्लृप्ती शोधत अंगठय़ासह डोळ्यांच्या बुब्बुळाने वारांगणांची त्वरित ओळख पटवणाऱ्या सॉफ्टवेअरवर काम सुरू केले आहे. वारांगणावर तसा अभ्यासही करण्याची परवानगी शहर पोलिसांसह शासनाला मागितली आहे. या अभ्यासामुळे वारांगणांची माहिती देशभरात सेकंदात उपलब्ध होणे शक्य होईल.

नागपूरसह देशभरात वारांगणांकडून होणाऱ्या देहव्यापाराची व्याप्ती वाढत असल्याचे कटू सत्य आहे. हा व्यवसाय करणाऱ्या बऱ्याच मुली या अल्पवयीन वयोगटातीलही असतात. बऱ्याच मुलींना बरेच असामाजिक तत्त्व बळजबरीने या व्यवसायात ओढतात. ही असामाजिक तत्त्वे या सगळ्यांकडून एकाच शहरात व्यवसाय करवून घेत नाही. त्यांना नागपूरसह देशभरात विशिष्ट कालावधींनी नित्याने हलवले जाते. विविध शहरात अवैध व्यवसाय करताना अनेकदा पोलिसांकडून छापामारीत या महिलांसह ग्राहकालाही कारवाई दरम्यान अटक केली जाते. अटकेनंतर अल्पवयीन गटातील मुली या त्यांचे चुकीचे वय सांगून त्या अल्पवयीन नसल्याचे सांगतात, तर ओळख पटू नये म्हणून चुकीची नावेही सांगितली जाते.

पोलिसांकडून या मुलींचे खरे वय ओळखण्याकरिता शासकीय रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते. वैद्यकीय तपासणीत मुलींच्या शरीरातील जॉईंटच्या हाडांसह दातांची व इतर विविध तपासण्यांचाही समावेश असतो. या तपासणी स्त्रीरोग व प्रसूती विभागाच्या तज्ज्ञांसह न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे तज्ज्ञ करत असतात. विविध शहरात पकडल्या गेल्याने त्या पोलीस ठाण्यात या आरोपींची विविध नावे नमूद असल्याने त्यांच्यावरील अचूक नमूद गुन्ह्य़ाची माहिती पोलिसांसह शासनाकडे नसते. सोबत या वारांगणांना ‘एचआयव्ही’सह गंभीर गटातील आजार असल्यास शासनाकडून त्यांच्यावर अचूक लक्षही ठेवले जात नाही. तेव्हा नागपूरच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी नवीन सॉफ्टवेअरवर काम सुरू केले आहे.

या उपक्रमांतर्गत त्यांनी शहर पोलिसांसह शासनाला वारांगणांचा अभ्यास करण्याची परवानगीही मागितली आहे. प्रकल्पात ते सगळ्या वारांगणांच्या अंगठय़ाचे ठसे व डोळ्यांच्या बुब्बुळांच्या रेटीनाची ओळख नावासह संग्रहित करतील. पोलिसांनी पकडल्यावर वारांगणांच्या होणाऱ्या वैद्यकीय तपासणीच्या दरम्यान हा उपक्रम राबवला जाईल. त्यानंतर महाराष्ट्रासह देशाच्या कोणत्याही भागात पोलिसांनी वारांगणांना पकडल्यावर त्यांच्या अंगठय़ाचा ठसा या सॉफ्टवेअरमध्ये टाकताच सेकंदात या महिलेची माहिती संगणकाच्या स्क्रिनवर असेल.

तेव्हा या संवर्गातील महिलांच्या गुन्ह्य़ांच्या एकत्रित माहितीसह त्यांना एड्ससह गंभीर आजार असल्यास शासनाला त्यांच्यावर नजरही ठेवणे शक्य होईल.

माहिती आधारला लिंक होऊ शकणार

वारांगणांचा अभ्यास झाल्यास संग्रहित होणारी माहिती आधार कार्डाशी लिंक करणे शक्य होणार आहे. त्यामुळे या महिलेने पोलिसांना स्वत:चे नाव चुकीचे सांगितले तरी तिचे आधार कार्डवरील खरे नाव पुढे येईल. सोबत या महिलेचे आधार कार्ड नसल्यास ते प्रकल्पांतर्गत काढून दिले जाईल. शासनासह पोलिसांकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची आशा असून त्यानंतर यावर खरे काम सुरू होईल.

डॉ. मनीष श्रीगिरीवार, न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्राध्यापक, नागपूर</strong>