अतिक्रमण पथकास ठिकठिकाणी विरोध

गेल्या पंचवीस दिवसांपासून अनधिकृत धार्मिक स्थळावरील  स्थगित केलेली कारवाई  महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासने पुन्हा सुरू केली आहे. न्यायालयाने या संदर्भात फटकारल्यानंतर ही कारवाई सुरू केली असली तरी अतिक्रमण पथकाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असून  महापालिकेने चारपैकी केवळ एका धार्मिक स्थळावर तर नासुप्रने पाचपैकी तीन धार्मिक स्थळावर पोलीस बंदोबस्तामध्ये कारवाई केली.

गेल्या महिन्यात शहरातील विविध भागातील कारवाईत २०० पेक्षा अधिक धार्मिक स्थळे नष्ट केली होती. नंतर ती थंबली. दोन दिवसांपूर्वी न्यायलयाने महापालिका आणि नासुप्रला कारवाई का थांबवली, अशी विचारणा केल्याने  ऐन श्रावण महिन्यात ही कारवाई पुन्हा सुरू केली. महापालिकेचे पथक सकाळी जुनी शुक्रवारी भागातील रस्त्याच्या कडेला असलेले धार्मिक स्थळ पाडण्यासाठी गेले असताना तेथील नागरिकांनी विरोध केला. चुनाभट्टी येथील गोडाऊनजवळील धार्मिक स्थळ पाडण्यात महापालिकेला यश आले. मात्र, त्या ठिकाणी परिसरातील लोकांनी विरोध केला. न्यू कॅन्सर रुग्णालयाजवळ, नवीन शुक्रवारी काका हार्डवेअर समोरील आणि गाडीखाना भागातील धार्मिक स्थळांवर कारवाई न करता पथक परतले.

नागपूर सुधार प्रन्यासच्या क्षतीपथकाने उत्तर नागपुरातील पंचवटीनगर, विटाभट्टी रोड, इंदिरा माता नगर, बिनाकी झोपडपट्टी, आनंद नगर, बिनाकी या ठिकाणी असलेल्या धार्मिक स्थळांवर कारवाई केली. पंचवटीनगरातील पथकाला विरोध केला. यावेळी परिसरातील लोक कारवाई टाळण्यासाठी बुलडोझर वर चढले होते मात्र पोलिसांनी सर्वाना खाली उतरविले. त्यानंतर मंदिरात ठिय्या आंदोलन झाल्यावर पोलीस बंदोबस्तामध्ये कारवाई करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत  विविध धार्मिक स्थळांवर नासुप्रतर्फे कारवाई सुरू होती. महापालिकेच्यावतीने अशोक पाटील तर नासुप्रचे पूर्व विभागातील कार्यकारी अभियंता राजेश मेघराजानी, क्षतीपथक प्रमुख मनोहर पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई केली.

श्रावणातील कारवाईला विरोध

महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासने ऐन श्रावण महिन्यात धार्मिक स्थळांवर कारवाई सुरू केल्यानंतर विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाने ठिकठिकाणी विरोध केला. रस्त्यावर आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होत असलेली धार्मिक स्थळे पाडण्यास आमची हरकत नाही. मात्र खुल्या मैदानातील धार्मिक स्थळे पाडली जात आहेत. यामुळे पुन्हा एकदा रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याचा इशारा बजरंग दलाचे राजकुमार शर्मा यांनी दिला.