लेफ्टनंट  क्षितिज लिमसे यांचे मत; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

नागपूर: सशस्त्र दल हे उत्तम करिअर आहे. सोबतच राष्ट्र उभारणीच्या कार्यात सहभागी होण्याची संधीही आहे. विदर्भात मात्र या क्षेत्राबद्दल फारशी जागरूकता नाही. माझे मित्र आता मला तू सीमेवर जाऊन राहशील काय, असा प्रश्न विचारतात. यावरून सशस्त्र दलाबाबत लोकांमध्ये किती अज्ञान आहे हे लक्षात येते. सीमेचे रक्षण हे सशस्त्र दलाचे आद्य कर्तव्य आहेच, पण त्याशिवायही अनेक गोष्टी येथे आहेत. व्यक्तीच्या सर्वंकष विकासाचे हे दालन आहे, अशा शब्दात नवनियुक्त लेफ्टनंट  क्षितिज लिमसे यांनी सैन्य दलाचा गौरव केला.

शुक्रवारी लोकसत्ता कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीत त्यांनी सशस्त्र दलातील करिअरबाबत माहिती दिली. राष्ट्रीय संरक्षण अकादमीतून प्रशिक्षण प्राप्त २२ वर्षीय लेफ्टनंट लिमसे यावर्षीच्या तुकडीचे विदर्भातील एकमेव अधिकारी आहेत. ते नागपुरातील आहेत. ते आता कामठी येथील गार्ड्स रेजिमेंटमल काही दिवसांचे प्रशिक्षण घेतल्यानंतर ‘२२ मॅकानाईज्ड इन्फेन्ट्री’ रूजू होतील. लिमसे यांनी दहावीनंतर

औरंगाबाद येथील एसपीआय (सव्‍‌र्हीस प्रिपरेटरी इन्स्टीटयुट) या संस्थेत प्रवेश घेतला. त्यांनतर केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे आयोजित परीक्षा उत्तीर्ण करुन पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमी येथे प्रवेश घेतला.

वडील सशस्त्र दलात होते. त्यामुळे समज आल्यापासून सेनेच्या गणवेशाचे आकर्षण होते. शाळेत असताना एनसीसीमधून सशस्त्र दलाची आणखी माहिती मिळाली. त्यामुळे आठव्या वर्गात असतानाच सैन्यदलात करिअर करण्याचे ठरवले.

कॉर्पोरेट क्षेत्र आणि सशस्त्र दलातील फरक सांगताना ते म्हणाले, इतर सेवांमध्ये दहा ते पाच अशी कामाची वेळ असते. अशाप्रकारचे काम आपल्याल्या करायचे नाही, असे मला वाटत होते. सशस्त्र दलात ‘ऑन ग्राऊंड’ अनेक काम असतात. शिवाय खेळणे आणि कर्तव्यासाठी वेगवेळ्या ठिकाणी जाणे आवश्यक असते. कॉर्पोरेट क्षेत्रात एका विषयात तज्ज्ञ होता येते, पण सशस्त्र दलात एकूणच व्यक्तिमत्त्व विकासाला खूप वाव आहे. शिवाय आपले छंद जोपासण्याची, अभ्यास करून पुढे जाण्याची संधी येथे आहे,  असे लिमसे म्हणाले.

वडिलांमुळे सैन्यदलाबद्दल कल्पना होतीच. तेथील जीवन पद्धती माहिती होती.

मला स्पोर्ट्सची आवड होती. सैन्यदलात खेळायला मिळते हे मला माहीत  होते. एनएनसीमध्ये असताना दोन-तीन कॅम्पमध्ये सहभागी झालो होतो. तेव्हा सैन्यदलाची बरीचशी कार्यपद्धती कळली. देशकार्यात सहभागाची ही संधी होती. येथे युनिफॉर्मचा सन्मान असतो, स्वताचा अभिमान असतो.

तर तरुण सैन्यदलाकडे आकर्षित होतील

थराराची आवड असेल, बाहेर जाणे, फिरणे यात रूची असेल. क्रीडा प्रकार आवडत असतील त्यांनी या क्षेत्राकडे  जरूर वळले पाहिजे. युवकांना या क्षेत्रात आवड निर्माण करण्यासाठी त्यांना परेड दाखवणे, सैनिक स्कूलला भेट देणे अशी उपक्रम राबवली गेली पाहिजे. त्यामुळे अधिकाधिक मुले सैन्यदलाकडे आकर्षित होऊ शकतील.

सन्मानाचे पद

सशस्त्र दलात प्रत्येकाची काळजी घेतली जाते. येथील कार्य संस्कृती अतिशय चांगली असून सतत प्रोत्साहन दिले जाते. सोबतच कर्तव्य अधिक चांगल्या प्रकारे बजावता यावे म्हणून विविध अभ्यासक्रम शिकवले जातात. शिवाय सातव्या वेतन आयोग लागू झाला आहे. त्यामुळे पगारही उत्तम आहे. शिवाय सशस्त्र दलाचा अधिकारी म्हणून सन्मान मिळतो.