News Flash

स्वच्छतेबाबत जागृती, पण कचरागाडय़ाच पोहोचत नाहीत!

 स्वच्छ भारत योजनेअंतर्गत महापालिका प्रशासनाच्यावतीने गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात जनजागृती केली जात आहे.

(संग्रहित छायाचित्र)

राम भाकरे

दोन-दोन दिवस घरात कचरा साठून

पूर्वी घरातील कचरा उचलण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून कुठल्याही सोयीसुविधा नसल्यामुळे शहरातील विविध भागात कचऱ्याचे साम्राज्य दिसत होते. मात्र गेल्या काही वर्षांत महापालिकेने स्वच्छतेबाबत केलेल्या जनजागृतीमुळे नागरिक  स्वच्छतेबाबत जागृत झाले आहेत. एकल घरांसह अनेक सदनिकांमध्येही ओला, सुका कचरा वेगळा करून त्याची विल्हेवाट लावली जाते, परंतु शहरातून कचरा संकलित करणाऱ्या कचरागाडय़ा दोन-दोन दिवस विलंबाने येत असल्याने साठवलेला कचरा ठेवायचा कुठे, असा प्रश्न अनेकांना अस्वस्थ करीत असतो.

स्वच्छ भारत योजनेअंतर्गत महापालिका प्रशासनाच्यावतीने गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात जनजागृती केली जात आहे. पूर्वी घरोघरी जमा करण्यात आलेला कचरा हा रस्त्यावर किंवा घराजवळ असलेल्या कचरा घरामध्ये नेऊन टाकला जात होता. त्यामुळे अनेकांच्या वस्त्यांमध्ये कचरा घर तयार झाले होते.

विशेषत: अपार्टमेंट किंवा सोसायटीमध्ये घरोघरी जमा झालेला कचरा नंतर मोकळी जागा पाहून फेकला जात होता. यावर उपाय म्हणून महापालिकेने वस्त्यांमध्ये कचरा साठवण्यासाठी लोखंडी कठडे तयार केले, परंतु यातूनही कचरा ओसंडून वाहत असल्याने घराघरातून कचऱ्याची उचल करण्यासाठी कनक या खासगी कंपनीकडे कचरा संकलनाचे काम सोपवण्यात आले. सुरुवातीच्या काळात या कंपनीने चांगले काम केले, परंतु आता कचरा संकलनाचे काम ढेपाळले आहे. दोन-दोन दिवस गाडी फिरत नसल्यामुळे  लोकांकडे कचरा साठून राहत आहे. महापालिकेने ओला व सुका कचरा विलगीकरणासाठी दोन डबे देण्याचा निर्णय घेतला.

मात्र, केवळ १५ हजार घरापर्यंत डबे पोहोचले आणि ही योजना सपशेल अपयशी ठरली. सोसायटी आणि अपार्टमेंटमध्ये सदनिका धारकांना कचरा गोळा करण्यासाठी खासगी सफाई कामगारांची नियुक्ती करावी लागली.

अपार्टमेंट किंवा सोसायटीमध्ये स्वच्छतेबाबत नागरिक जागृत झाले असले तरी झोपडपट्टीमध्ये स्वच्छतेबाबत दुर्लक्ष केले जात आहे. झोपडपट्टीमधील कचरा आजही रस्त्यावर किंवा फुटपाथवर टाकला जात आहे. नंदनवन झोपडपट्टीमधील अनेक लोक आजही रस्त्याच्या दुभाजकावर कचरा आणून टाकतात.

आमच्या सोसायटीमध्ये १२५ च्यावर सदनिका असून प्रत्येकाला कचरा टाकण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. आम्ही प्लास्टिकमध्ये कचरा जमा करून ठेवतो. सफाई कर्मचारी येऊन तो घेऊन जात असतो. त्यामुळे घरासमोर कुणीही कचरा टाकत नाही. शिवाय आठवडय़ामध्ये एक दिवस साफसफाई अभियान राबवले जाते. महापालिकेची कचरागाडी मात्र नियमित येत नाही.

– विजया दुधे, निर्मल उज्ज्वल सोसायटी

अपार्टमेंट किंवा सोसायटीमध्ये कचरा उचलण्यासाठी खासगी सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जात असली तरी महापालिकेची कचरागाडी त्या त्या अपार्टमेंटमध्ये जाऊन कचरा गोळा करीत असते. लोकांना आता कचरा गोळा करून तो गाडीत टाकण्याची सवय लागलेली आहे. मात्र, शहरातील मोठय़ा अपार्टमेंट किंवा सोसायटींनी कचरा साठवून त्याचे खत तयार करण्याची प्रक्रिया अवलंबली पाहिजे. त्या दृष्टीने महापालिकेच्यावतीनेही प्रयत्न केले जात आहेत.

– दिलीप कांबळे, आरोग्य अधिकारी, महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2018 2:00 am

Web Title: awareness about cleanliness but not reaching garbage van
Next Stories
1 भीक मागणाऱ्या मुलांना शाळेची गोडी
2 पक्षी निरीक्षक, अभ्यासकांसाठी ‘सीबा’ एक प्रबोधिनी ठरेल!
3 राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत नागपूरकर खेळाडूंची वानवा
Just Now!
X