14 October 2019

News Flash

बिहारचे युवक नसते तर महाराष्ट्रातील कारखाने बंद झाले असते!

बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांचे वक्तव्य

सुशीलकुमार मोदी

बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांचे वक्तव्य

नागपूर : महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात बिहारी युवक काम करीत आहेत. ते नसते तर येथील उद्योग, कारखाने बंद झाले असते, असे मत बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार मोदी यांनी व्यक्त केले. बिहारमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात आल्या आणि त्याचवेळी चंद्रावर उद्योग सुरू झाले तर बिहारमधील युवक तिथेही रोजगारासाठी जातील, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीकरिता जाहीरनामा बनवण्यासाठी ‘आपल्या मनाची बात’ ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेची माहिती देण्यासाठी  मोदी नागपुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते. मनसे आणि शिवसेनेने बाहेरच्या  राज्यातून महाराष्ट्रात रोजगारासाठी आलेल्यांच्या विरोधात आंदोलन केले. त्याचा संदर्भ देत मोदी म्हणाले, लोकशाहीमध्ये देशातील प्रत्येक नागरिकाला कुठल्याही राज्यात रोजगार मिळवण्याचा अधिकार आहे. त्यानुसार महाराष्ट्रात बिहारी बेरोजगार येत असतील  तर त्यात गैर काय आहे? बिहार, उत्तर प्रदेशमध्ये मोठय़ा प्रमाणात महाराष्ट्रातील युवक नोकरी-रोजगार करीत आहेत. त्यांना तेथील जनता सन्मानाची वागणूक देते. पंतप्रधान मोदी यांनी राफेलबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे आणि सभागृहात त्यावर चर्चाही झाली आहे. मात्र, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी खोटे बोलून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर विरोधकांची महाआघाडी टिकणारी नाही, असेही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजप देशभरातील १० कोटी लोकांशी संपर्क साधून संकल्पपत्र भरून घेणार आहे. विविध राज्यात पुढील ४० दिवस ३०० रथ फिरणार असून त्या माध्यमातून सरकारने पाच वर्षांत राबवलेल्या विविध  योजनांची माहिती दिली जाणार आहे, असे त्यांनी सांगितळे.

शत्रुघ्न सिन्हा म्हणजे प्रियंका चोप्रा नाही

अभिनेते शत्रुघ्न सिन्हा म्हणजे अभिनेत्री प्रियंका चोप्रा नाही. बिहारमध्ये सिन्हा यांचे आकर्षण राहिले नाही. लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजप विरोधी प्रचार केला तरी काही फरक पडणार नाही. उलट त्यांनी पाटण्यातून निवडणूक लढून ती जिंकून दाखवावी, असे आव्हान मोदी यांनी दिले.

तेजस्वी यादव जवळ अब्जावधींची अपसंपदा

राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव जवळ ५३ मालमत्ता आहेत.  त्यानंतरही शासकीय बंगला सोडण्यास ते तयार नाहीत. लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यामध्ये शिक्षा झाल्यानंतरही त्यांच्यात काही फरक पडला नाही. भ्रष्टाचार करून अब्जावधींची संपत्ती त्यांनी जमा केली आहे.

First Published on February 9, 2019 1:51 am

Web Title: bihar youth play important role in maharashtra development sushil kumar modi