काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला यश

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नागपूर जिल्ह्य़ामध्ये भाजपला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर गेल्या वर्षभरात गड समजल्या जाणाऱ्या कुही, भिवापूर आणि हिंगणामध्ये नगरपरिषदेच्या निवडणुकीत मात्र भाजपला गडावरून गडगडून पायउतार व्हावे लागले. रामटेक लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या हिंगणा आणि उमरेड या विधानसभा मतदारसंघात या तीन तालुक्यांचा समावेश असून, त्या ठिकाणी भाजपचे आमदार आहेत, हे विशेष.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे वर्चस्व आणि गड समजल्या जाणाऱ्या नागपूर जिल्ह्य़ातील तीन तालुक्यांमध्ये यश मिळाले नाही. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्य़ात सावनेर वगळता पाच मतदारसंघात भाजपचे उमेदवार निवडून आले होते. जिल्ह्य़ात भाजपसाठी चांगले अनुकूल वातावरण तयार झाले होते. राज्य सरकारने जिल्ह्य़ासाठी अनेक योजना जाहीर केल्या असताना गेल्या वर्षभरात त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. ग्रामीण भागातील जनतेला हवी असलेली विकास कामे होऊ शकली नाही आणि संघटनात्मक कामातही गेल्या काही दिवसात शिथिलता आल्यामुळे ग्रामीण जनतेने भाजपला नाकारल्याचे समोर आले आले आहे. हिंगणा नगरपरिषद गेल्या आठ वर्षांपासून भाजपकडे असताना आणि सागर मेघे आमदार असताना यावेळी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने १७ पैकी ११ जागा जिंकून वर्चस्व मिळवून एकहाती सत्ता मिळविली आहे. उमरेड मतदारसंघात भाजपचे सुधीर पारवे आमदार आहे. विधानसभा निवडणुकीत भिवापूर आणि कुही या मतदारसंघताून सर्वात जास्त आघाडी मिळाली असताना यावेळी भाजपला नाकारले.

जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या अंतर्गत वादाचा कुठलाही परिणाम निवडणुकीवर झाला नाही. जिल्हाध्यक्ष रमेश बंग यांचे निवासस्थान असलेल्या हिंगणा मतदारसंघात नगरपरिषदेवर गेल्या आठ वर्षांपासून सत्ता येत नव्हती. मात्र, यावेळी सत्तेत नसताना त्यांनी सत्ता मिळविली तर दुसरीकडे हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांचे प्रयत्न कमी पडल्याचे दिसून आले. कुही नगरपरिषदेमध्ये काँग्रेसला सर्वाधिक (८) जागा मिळाल्या असून त्या खालोखाल भाजपला (५) जागा मिळाल्या आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेला मात्र यश मिळाले नाही. भिवापूर नगरपरिषदेमध्ये काँग्रेसचे पाच तर भाजपचे ३ उमेदवार निवडून आले आहे. या ठिकाणी  शिवसेनाला ४ जागा मिळाल्या. कुही व भिवापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले नाही. कुही आणि भिवापूर नगरपरिषदेवर भाजपचा कब्जा असताना त्या कायम ठेवण्यात त्यांना यश आले नाही.

२०१७ मध्ये महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या असताना जिल्ह्य़ातील तीन नगरपरिषदेवर भाजपची घसरगुंडी झाली आहे. दोन वर्षांपूर्वी जिल्हा ग्रामीण अध्यक्ष राहिलेले आणि सध्या राज्यात ऊर्जामंत्री असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांची जिल्ह्य़ातील पकड कमी झाल्याचे बोलले जात आहे.

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रमेश बंग म्हणाले, भाजपने ग्रामीण जनतेला अनेक आश्वासने दिली होती मात्र, वर्षभराच्या काळात ती पूर्ण केली नाही. ग्रामीण भागातील जनतेला आश्वासनावर किती दिवस ठेवणार असा प्रश्न उपस्थित करून ही भाजपच्या पराभवाची नांदी आहे, असा आरोप बंग यांनी केला.

भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार म्हणाले, कुही, भिवापूर आणि हिंगणामध्ये यश मिळाले नसले तरी पक्षाचे संघटनात्मक बळ कुठेही कमी झाले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रमेश बंग आणि काँग्रेसचे नेते राजेंद्र मुळक यांनी धनशक्तीचा वापर केला, असा आरोप केला. जिल्ह्य़ात आमची पकड कुठेच कमी झाली नाही. या निवडणुकीत लहान वार्ड असून अतिशय कमी मतदार असतात मात्र झालेल्या पराभवाबाबत संघटनात्मकदृष्टय़ा विचार करण्यात येईल, असेही पोतदार म्हणाले.