मारेकऱ्यांचा अद्याप पुरावा नाही

नागपूर : वाहतूक व्यवसायी भूपेंदरसिंग ऊर्फ बॉबी मंजितसिंग माकन (४६) रा. दीक्षितनगर याच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतरही स्पष्ट होऊ शकले नाही. हा खून असल्याचा स्पष्ट झाले असतानाही मारेकऱ्यांचाही कोणताच पुरावा न सापडल्याने पोलिसांना हत्याकांडाचे गूढ उकलण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

बॉबी याचे यादवनगर परिसरातील त्याच्या कार्यालयाजवळून अपहरण करून खून करण्यात आला. त्यानंतर कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका नदीच्या पुलाखाली मृतदेह फेकण्यात आला. अपहरणाच्या तीन दिवसांनी त्याचा मृतदेह सापडला. या मृतदेहाचे सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) शवविच्छेदन करण्यात आले. या शवविच्छेदनात त्याचा गळा आवळून किंवा इतरप्रकारे खून करण्यात आल्याचे कोणतेच पुरावे सापडले नाही. त्यामुळे मेडिकलच्या डॉक्टरांसह शासकीय न्यायसहाय्यक प्रयोगशाळेतील दोन तज्ज्ञ व इतरांच्या उपस्थितीत विसेरा जमा करण्यात आला. कदाचित पेय किंवा खाण्यातून विष देऊन त्याचा खून करण्यात आला असण्याची शक्यताआहे. पण, त्याचेही प्रमाण खूप कमी असावे, असे शवविच्छेदन करणारे डॉक्टर अप्रत्यक्षपणे सांगत आहेत.

दुसरीकडे कार्यालयातून त्याचे अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेली दुसऱ्या इन्होवा कारचा अद्याप शोध लागलेला नाही. २५ एप्रिलच्या रात्री ११.३० वाजेपर्यंत छोटू कॅटर, बंटी खालसा, पज्जू व टिटू शर्मा हे बॉबीसोबत त्याच्या कार्यालयात जुगार खेळत होते. गुन्हे शाखा पोलिसांकडून त्यांची तपासणी केल्याची माहिती आहे. तसेच बॉबीसोबत नेहमी राहणारा शेंडे नावाच्या व्यक्तीचीही चौकशी करण्यात आली. पण, अद्याप ठोस पुरावे हाती लागलेले नाहीत. त्यामुळे हत्याकांडाचे गूढ उकलण्यात पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

रोज बाहेरचे जेवण

बॉबी याने आपल्या पसंतीप्रमाणे विवाह केला. त्यांना दोन मुलेही होती. पण, गेल्या काही वर्षांपासून पत्नी परमिंदर कौर (४९) रा. साई निवास, बंगला दीक्षितनगर यांच्याशी त्यांचे पटत नव्हते. मुलांमुळे ते सोबत होते, असे सांगण्यात येते. त्यामुळे बॉबी हा दररोज सकाळी व सायंकाळी खाना-खजाना या हॉटेलमधून भोजन मागवायचा. याप्रकरणी पोलीस बॉबीची पत्नी व त्याच्या मेहुण्याचीही चौकशी करणार असल्याची माहिती आहे.

अनेक भूखंडांवर अतिक्रमण

बॉबी हा पूर्वी कमाल चौक परिसरात पवन मोरयानी याच्या वडिलांच्या इमारतीमध्येभाडय़ाने राहायचा. जवळपास तीस वर्षे ते आपल्या कुटुंबासह राहात होता. घर रिकामे करण्यावरून त्यांचा वाद होता. त्याने दुसरीकडे घर बांधल्यानंतर मोरयानीचे घर रिकामे केले नव्हते. त्या घरात आपल्या आईला ठेवले होते. काही वर्षांपूर्वी आईचे निधन झाले.तसेच कुख्यात लिटिल सरदार, क्रिकेट बुकी मनोज शर्मा यांच्याही भूखंडांवर त्याने अतिक्रमण केले होते. त्यामुळे अनेकांशी त्याचा वाद होता. वाहतूक व्यवसायात नुकसान झाल्यानंतर तो जुगार, मटका व क्रिकेट सट्टा चालवण्याच्या अवैध धंद्यांमध्ये उतरला. त्याच्याविरुद्ध छिंदवाडा येथे गोळीबार करण्याचा गुन्हाही दाखल आहे.