मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय व राज्य इमारत व इतर बांधकाम कामकार कल्याण मंडळाचे अध्यक्ष मुन्ना यादव यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून ते अद्याप फरार आहेत, त्यांचा शोध लागत नसेल तर पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या फोनमधील तपशील तपासावे, त्यातून त्यांना यादव यांचा ठावठिकाणा कळेल, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले.

विरोधी पक्षाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना मुंडे यांनी राज्यातील कायदा व सुव्यस्थेच्या मुद्यावर यादव यांच्यावरून थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधला. यादव यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून ते सध्या फरार आहेत, त्यांचा शोध सुरू आहे, असे उत्तर गेल्या एक महिन्यापासून नागपूर पोलीस देत आहेत. या मुद्यावर बोलताना मुंडे म्हणाले, यादव यांचा शोध लागत नसेल तर पोलिसांनी मुख्यमंत्र्यांचा फोन तपासावा, त्यातून त्यांचा ठावठिकाणा कळेल. भ्रष्टाचारमुक्त सरकार देऊ, असा दावा करणारे फडणवीस यांचे सरकार भ्रष्टाचारयुक्त आहे, मंत्र्यांचे अनेक घोटाळे उघड केल्यावर ते त्यांना ‘क्लिन चीट’ देतात. गुन्हेगारीचे प्रमाण राज्यासह नागपुरातही वाढले आहे, याकडे मुंडे यांनी लक्ष वेधले.

मुंडेंकडे फोन देण्यास तयार -मुख्यमंत्री

यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता, त्यांनी मुंडेंच्या आरोपाचे खंडन केले नाही, पण आपण त्यांना आपला फोन देण्यास तयार आहोत, असे सांगितले. त्याचबरोबर कोण किती काळ फरार होते, आणि कुठे होते, याचा सर्व तपशील आपल्याकडे आहे, तो सभागृहात जाहीर करू, असा इशाराही त्यांनी दिला. त्यांचा रोख मुंडे यांच्याकडेच होता.