कोराडीच्या ‘एमव्हीएम’ चमूचा अनोखा उपक्रम

महाविद्यालयीन जगात त्यांनी नुकतेच पाऊल ठेवलेले. शिक्षणासोबतच हे त्यांच्या हिंडण्याफिरण्याचे, मौजमजेचे वय, पण शिक्षणापलीकडे त्यांचा कल समाजासाठी काहीतरी करण्याकडे असतो. पाहता पाहता तब्बल ६० ते ७० जणांच्या चमूने आपापल्या परीने सामाजिक कार्यातून समाजाचे ऋण फेडण्यास सुरुवात केली आहे. एमव्हीएम कोराडीची अवघ्या १६-१७ वर्षांची तरुणाईची ही चमू इतरांना  नवी दिशा देण्याचे काम करीत आहे.

स्वच्छ भारत, सुंदर भारत ही केंद्राने दिलेली हाक ही मुले प्रत्यक्षात आणत आहेत. एवढेच नव्हे तर गरीब, गरजूंना मदत ही त्यांची प्राथमिकता आहे. अलीकडेच या मुलांनी रेल्वेस्थानकाच्या मागे उकिरडय़ावर आयुष्य काढणाऱ्यांना कपडय़ांचे वाटप केले. क्रिकेट खेळता खेळता कधी तरी त्यांना हे आजूबाजूचे जग दिसले आणि येथून त्यांच्या मनात समाजाच्या या दुसऱ्या रूपाने घर केले. वृक्षारोपणापासून आपल्या कार्याची सुरुवात करणाऱ्यांना रस्त्यावर राहूनही माणसे जगतात, आयुष्य काढतात हे दिसले. मग अशावेळी त्यांच्या आयुष्यात थोडाफार बदल घडवता आला तर, असा प्रश्न त्यांच्या मनात उपस्थित झाला. शहरात सध्या मेट्रो प्रकल्प सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर जगणारी ही माणसे उकिरडय़ावर आली आहेत.  रेल्वेस्थानकामागची परिस्थिती त्यांनी पाहिली आणि मग त्यांच्या आयुष्यात प्रकाश आणण्यासाठी ही मुले पुढे सरसावली. पहिल्यांदा या वस्तीत गेल्यानंतर पहिले पाऊल चिखलात पडले, तर दुसरे उकिरडय़ात. मोठीच नव्हे तर चिमुकली मुलेही अक्षरश: उकिरडय़ावरील किडय़ामुंग्यांसारखी राहत होती.  या वस्तीत एमव्हीएम कोराडीच्या चमूने त्यांना स्वच्छतेची जाण करून दिली. त्यांना जमेल तसे कपडे नेऊन दिले. त्यावेळी देणाऱ्या तरुणाईच्या आणि घेणाऱ्यांच्याही चेहऱ्यावर आनंद होता.

‘‘एमव्हीएमच्या चमूतील काही मुले इंजिनिअरिंगला पाऊल ठेवलेली, तर काही नुकतीच बारावी झालेली आहेत. आम्हाला काही तरी समाजासाठी करायचे होते, कारण आम्ही समाजाचे कुठेतरी देणे लागतो. म्हणून आम्ही ही सुरुवात केली. खूप काही मोठे आणि भव्यदिव्य करायचा असा आमचा मानस नाही, पण आपापल्या परीने जेवढे करता येईल, तेवढे करण्याचा प्रयत्न नक्कीच राहील. घरच्यांचा पाठिंबा देखील खूप बळ देऊन जात आहे. ’

      – एमव्हीएम कोराडी ग्रुप