X

पोलीस ठाण्यात नागरिकांना सौहार्दपूर्ण वागणूक मिळायलाच हवी

‘लोकसत्ता’ कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर आपली स्पष्ट मते मांडली.

पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांचे मत; ‘लोकसत्ता’ला सदिच्छा भेट

अडचणीत सापडल्याशिवाय सर्वसामान्य नागरिक पोलीस ठाण्यात येत नाही. अशा स्थितीत त्या नागरिकाला  पोलिसांकडून मदतीची अपेक्षा असते. यावेळी तक्रारदार व पीडितांसोबत पोलिसांचा व्यवहार सौहार्दपूर्णच असायला हवा. मात्र, समाजात पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या व्यवहारासंदर्भात नकारात्मक मत आहे. हे मत बदलण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करायला हवे, जे लोक त्यांच्याकडे आपल्या तक्रारी घेऊन येतात, त्यांची समस्या ऐकून योग्य ती कारवाई करायला हवी. नागपूरचा पोलीस आयुक्त म्हणून यासाठी मी विशेष प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिली.

‘लोकसत्ता’ कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर आपली स्पष्ट मते मांडली. ते म्हणाले, एखादी व्यक्ती पोलीस विभागाशी संबंधित नसलेली तक्रार घेऊन ठाण्यात येत असेल तर त्याला तसे मार्गदर्शन केले पाहिजे. यामुळे पोलिसांप्रती समाजात असलेली नकारात्मक भूमिका बदलेल. ती बदलावी यासाठी कर्मचाऱ्यांना कार्यशाळांच्या माध्यमातून मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक आदींचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाईल. त्याशिवाय शहरात शीघ्रकोपीपणामुळे अनेक गुन्हे घडताना दिसतात. त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे तसे कठीण असते. पण, अभिलेखावरील गुन्हेगारी व गुन्हेगारांच्या टोळ्यांकडून घडणारे गुन्हे रोखण्यासाठी, गुन्हेगारांना जेरबंद करण्यासाठी ऑपरेशन ‘क्रॅकडाऊन’ सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत त्या अंतर्गत दोन देशीकट्टे, ४० ते ५० तलवारी, २० ते २५ चाकू जप्त करण्यात आले असून अनेक गुन्हेगारांना पकडण्यात आले आहे. भविष्यात घरफोडी करणाऱ्यांच्या टोळ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल. खुनाच्या प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल.  भूखंड माफिया व आर्थिक फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. फसवणुकीमुळे लोक उद्ध्वस्त होतात. त्यामुळे पांढरपेशा गुन्हेगारांचा बुरखा फाडून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. त्याकरिता आर्थिक गुन्हे शाखेला अधिक मजबूत करण्यात येईल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

बालगुन्हेगारांसाठी विशेष केंद्र

अल्पवयीन गुन्हेगारांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे. मात्र, अशा गुन्हेगारांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते गुन्हेगारीपासून परावृत्त होऊ शकतात. पोलिसांच्या अहवालानुसार, शहरात जवळपास ४०० अशी मुले आहेत. त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन व समुपदेशन करण्यासाठी विशेष केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

एनडीपीएसमध्ये मनुष्यबळ वाढवणार

शाळकरी मुलांपासून ते प्रौढ व्यक्तीपर्यंत अनेक जण नशा करतात. या नशेखोरीमुळे अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होते. त्यामुळे अंमली पदार्थाचे सेवन रोखण्यासाठी व तस्करीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या (एनडीपीएस) कारवायांमध्ये वाढ करण्यात येईल. त्यासाठी एनडीपीएसमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात येईल. शाळकरी मुलांमध्ये अंमली पदार्थ सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामाविषयी शाळा व महाविद्यालयांमधून जनजागृती करण्यात येईल. त्यामुळे पूर्वीच्या ‘मिशन मृत्यूंजय’प्रमाणे उपक्रम हाती घेऊन शालेय मुलांना जोडण्यात येईल, अशी माहितीही पोलीस आयुक्तांनी दिली.

वाहतुकीला शिस्त लावणार

शहरात विकास कामे सुरू आहेत. संबंधित यंत्रणांना रस्त्यांवर स्वयंसेवक नेमायला व पर्यायी रस्ते सुरक्षित करायला सांगितले आहे. शहरात जवळपास ३  हजार ६०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून त्यांच्यामार्फत वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यात येईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना ऑनलाईन चालान जात आहे. या माध्यमातून दररोज १५ ते २० हजार लोकांना चालान पाठवण्यात येतात. ही संख्या वाढवण्यावर भर असून रस्त्यांवरील वाहतूक पोलीस शिपायांनी सकाळी ९ ते ११.३० आणि सायंकाळी ४ ते ६ दरम्यान वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे.

नक्षलविरोधी सेल कार्यान्वित होणार

जंगलातील नक्षलवाद्यांचे समर्थन करणारे व त्यांच्यासाठी मनुष्यबळ तयार करणारे काही लोक शहरात वास्तव्यास असतात. त्यामुळे दिवसेंदिवस शहरी नक्षलवादाची चर्चा वाढत आहे. मात्र, अशा लोकांवर ठोस पुराव्यांशिवाय कारवाई करता येत नाही. त्यामुळे शहर पोलिसांचा आधीपासून अस्तित्वात असलेला नक्षलविरोधी सेल कार्यान्वित करण्यात येईल आणि गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने शहरी नक्षलवादावर लक्ष ठेवण्यात येईल, असेही डॉ. उपाध्याय म्हणाले.