नागपूरकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरात येऊन ठिकठिकाणच्या सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन ‘श्रीं’चे आशीर्वाद घेतले. सर्वाना आनंदी आणि सुखी ठेवा, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.
मुख्यमंत्री झाल्यानंतर येणारा हा पहिलाच गणेशोत्सव असल्याने नागपुरातील अनेक मंडळांनी त्यांना निमंत्रित केले होते. मुख्यमंत्र्यांचे शनिवारी मुंबईहून नागपूरला आगमन झाले. काही काळ रामगिरीवर विश्रांती घेतल्यानंतर त्यांच्या ‘मिशन गणेश दर्शन’ला सुरुवात झाली. कॉटन मार्केट, अजनी चौक, हावरापेठ, नरेंद्रनगर, श्यामनगर, त्रिमूर्तीनगर, प्रतापनगर, तात्याटोपेनगर, संती गणेश मंडळ, पश्चिमेश्वर हनुमान मंदिर, रामनगर येथील गणेश मंडळांच्या मंडपाला त्यांनी भेट देऊन श्रीचे दर्शन घेतले.
त्रिमूर्तीनगरच्या गणेश मंडळाने मुख्यमंत्री सहायता निधीला २१ हजार रुपयांचा धनादेश दिला. मुख्यमंत्र्यांसोबत महापौर प्रवीण दटके यांच्यासह भाजपचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. खुद्द राज्याचे मुख्यमंत्रीच येत असल्याने गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्येही कमालीचा उत्साह संचारला होता.
अमृतराज-मुख्यमंत्री भेट
प्रसिध्द टेनिसपटू विजय अमृतराज यांनी रविवारी नागपूरला येऊन रामगिरीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. टेनिस स्पर्धाबाबत या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. अधिकृत तपशील कळू शकला नाही.