चांदाफोर्ट रेल्वेमार्गावर पुन्हा एका बिबटय़ाचा मृत्यू

नागपूर : नागपूर-अमरावती मार्गावर दोन वर्षांपूर्वी बाजीराव नावाच्या वाघाच्या मृत्यूनंतर, जंगलालगतच्या समांतर रेषीय प्रकल्पावरील वन्यप्राण्यांचे मृत्यू  टाळण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांकरिता समिती गठित करण्यात आली. मात्र, गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वेमार्गावर मंगळवारी झालेल्या बिबटय़ाच्या मृत्यूनंतर ही समिती म्हणजे निव्वळ देखावा तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

केंद्रीय वने, पर्यावरण आणि हवामान बदल खात्याच्या निर्देशानंतर वन्यप्राण्यांच्या अधिवासाआड येणाऱ्या जंगलालगतच्या समांतर रेषीय प्रकल्पांबाबत खबरदारीच्या उपाययोजना करण्यासाठी समिती गठनाचे निर्देश केंद्रीय वन्यजीव मंडळाने सर्व राज्यांना दिले होते. महाराष्ट्रातही ही समिती गठित झाली, पण समितीच्या बैठका, उपाययोजनांबाबतची कृती या सर्व गोष्टी गुलदस्त्यात आहेत. गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वेमार्ग वन्यप्राण्यांसाठी कर्दनकाळ ठरला आहे. आजवर या मार्गावर अस्वल, हरीण यासारखे अनेक वन्यप्राणी मृत्युमुखी पडले. दरम्यानच्या काळात हा मार्ग ओलांडत असताना वाघिणीचे तीन बछडे रेल्वेखाली येऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे या मार्गावर प्रतिबंधात्मक उपाययोजनांची मागणी राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत करण्यात आली. बाजीराव वाघाच्या मृत्यूनंतर गठित झालेली ही समिती यावर तोडगा काढेल, असे अपेक्षित होते, पण अजूनही याठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून या महामार्गापासून जवळच्याच फेटरी गावात वाघाचा संचार सुरू आहे. तो जर या महामार्गावरून गेला तर बाजीरावप्रमाणेच त्याच्या जीवाला धोका संभवू शकतो.  चांदाफोर्ट रेल्वेमार्गावर दरवर्षी कितीतरी वन्यप्राणी मृत्युमुखी पडतात. अशा ठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाई अजूनपर्यंत करण्यात आलेली नाही. त्यामुळे समितीच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

राज्य वन्यजीव मंडळात हा विषय मी वारंवार उपस्थित केला. याबाबत गठित समितीच्या बैठका घेण्याबाबत प्रधान मुख्य वनसंरक्षकांना (वन्यजीव) भेटून सूचित केले. मात्र, अद्यापही या समितीच्या बैठका गांभीर्याने घेतल्या जात नाहीत. जोपर्यंत े बैठका होणार नाहीत, तोपर्यंत मृत्यूची मालिका अशीच कायम राहील.

– किशोर रिठे, सदस्य राज्य वन्यजीव मंडळ

जंगलालगतच्या समांतर रेषीय प्रकल्पांवर समितीच्या नियमित बैठका होतात. उपाययोजनांवर या बैठकांमध्ये चर्चा होते. फक्त त्यात रेल्वेचा अजून तेवढा सहभाग  नाही, पण तो करायचा आहे. महामार्ग, वीज, सिंचन या विभागांचा सहभाग आहेच. चंद्रपूरच्या मुख्य वनसंरक्षकांनी रेल्वे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकाशी संपर्क साधला असून काय करायला हवे, याबाबत चर्चा केली आहे.

– नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव).