बांधकाम कंत्राटदारांचे पर्यावरणाकडे पूर्णत: दुर्लक्ष; हलक्या पावसानेही झाडे कोसळण्याचे प्रमाण वाढले

राखी चव्हाण, नागपूर</strong>

कधीकाळी वादळानेही उन्मळून न पडणाऱ्या शहरातील रस्त्यालगतच्या झाडांना आता साधारण पावसाच्या सरींचा भारही सोसवेनासा झाला आहे. याचे कारण, विकासाच्या वेगात रस्त्यांचे सिमेंटीकरण थेट झाडांच्या बुंध्यापर्यंत जाऊन पोहोचल्याने ते अशक्त झाले आहेत. झाडांचा श्वास या पद्धतीने रोखला जात असेल तर भविष्यात नागरिकांचा श्वासही धोक्यात येण्याची शक्यता आहे.

हिरवळीसाठी ओळखल्या जाणाऱ्या शहरांमध्ये उपराजधानीचा समावेश होतो. यात रस्त्यालगतच्या मोठमोठय़ा झाडांचे मोठे श्रेय आहे. महापालिका आणि नासुप्र शहरातील हिरवळ कायम राखण्यासाठी वृक्षारोपण मोहीम राबवते. शहरातील हिरवळीचे बाहेरून येणारे नागरिक देखील कौतुक करतात. मात्र, गेल्या चार वर्षांत रस्त्यांच्या सिमेंटीकरणाने या झाडांचा श्वासच रोखला गेला आहे.  शहर स्मार्ट होण्यासाठी सिमेंट रस्ते गरजेचेही आहेत, पण हे रस्ते बांधताना पर्यावरणाकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. रस्त्यांच्या कडेला असलेल्या झाडांची सुरक्षाही तेवढीच गरजेची आहे, याचे भान कंत्राटदारांना दिसत नाही. सिमेंट रस्ते तयार करताना बांधकामाचे निकषच पाळण्यात आले नाहीत. त्यामुळे जवळजवळ ७० टक्के रस्ते बांधकामाचे सिमेंटीकरण थेट झाडाच्या बुंध्यापर्यंत जाऊन पोहोचले आहे. रस्त्याशेजारी आकर्षक पदपथ तयार करताना मोठय़ा झाडांनाही गट्टने घेरले आहे. परिणामी, झाडांना श्वास घेण्याइतपतदेखील जागा उरलेली नाही.

प्रामुख्याने दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील प्रतापनगर ते कोतवालनगर परिसरातील रस्त्यालगतच्या झाडांची स्थिती अतिशय वाईट आहे. याठिकाणी चक्क झाडांच्या बुंध्यापर्यंत सिमेंटीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे मुळापर्यंत पाणी जाण्यासाठी जागाच नाही. ज्या काही कंत्राटदारांनी झाडांसाठी आळे केले आहे, त्या आळ्यांमध्ये सिमेंट आणि दगडांचा चुरा भरण्यात आला आहे. काही ठिकाणी हे आळेच विटा सिमेंटचे करण्यात आले आहेत. शहरातील सिव्हिल लाईन्स, सेमिनरी हिल्स, वर्धा रोड, जरीपटका, कोराडी रोड, काटोल रोड, प्रतापनगर, हिंगणा रोड यासारख्या अनेक मार्गावरील झाडांच्या मुळाला धरून काँक्रिटीकरण करण्यात आले असल्याने पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शहरात सर्वत्रच ही परिस्थिती आहे. कधीकाळी महापालिकेने झाडांच्या संवर्धनासाठी मोहीम हाती घेतली होती. सृष्टी पर्यावरण संस्थेने सुचवलेल्या पर्यायानंतर त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम सुरू झाली होती. मात्र, या मोहिमेला नेमका ‘ब्रेक’ कुठे लागला हे कळायला मार्ग नाही.

पाच वर्षांत पाचशे जुनी झाडे नष्ट

दरवर्षी पावसाळ्यात वादळामुळे झाडे पडत आहेत. गेल्या पाच वर्षांत सुमारे पाचशे जुनी झाडे पडली. राज्य शासनाच्या एक पाऊल हरितक्रांतीकडे या योजनेतून ४५ हजार झाडे लावण्याचा संकल्प गेल्यावर्षी महापालिकेने केला होता. गेल्यावर्षी महापौर नंदा जिचकार यांनीही सिमेंट रस्ते व मुख्य रस्त्यांच्या बाजूला साडेसात हजार झाडे लावण्याचा संकल्प केला होता. मात्र, हा संकल्प सिमेंट रस्त्यातच विरला आहे.

तीन झोनमध्ये थातूरमातूर काम

धरमपेठ, धंतोली, मंगळवारी झोनमधून झाडांचे बुंधे मोकळे करण्याचे काम सुरू झाले आहे, पण आत गेलेल्या सिमेंटला कसे थांबवणार, हाही प्रश्नच आहे. शहराच्या तीन झोनमध्ये झाडांचे बुंधे आणि रस्ते यात जागा तयार करण्यात येत आहे. त्यातही थातूरमातूर पद्धतीनेच काम सुरू आहे. झाडांचे संरक्षण करायचे असेल तर रस्ते झाडांच्या बुंध्यापर्यंत येणार नाहीत, या पद्धतीचे नियोजन करावे लागणार आहे.

– सृष्टी पर्यावरण संस्था