विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे पश्चिम नागपूरचे उमेदवार व शहर अध्यक्ष विकास ठाकरे, दक्षिण नागपूरचे उमेदवार गिरीश पांडव यांनी गुरुवारी शक्तिप्रदर्शन करून जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज सादर केले. यावेळी संविधान चौकात कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्कीचा सामना करावा लागला. आगे बढोच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

उद्या नामांकन अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे विविध राजकीय पक्षातील व अपक्ष उमेदवारांची नामांकन अर्ज भरण्यासाठी लगीनघाई सुरू झाली आहे. काँग्रेसचे पश्चिम नागपूरचे उमेदवार विकास ठाकरे, दक्षिण नागपूरचे उमेदवार गिरीश पांडव हे गुरुवारी समर्थकांसह संविधान चौकात पोहचल्यावर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. यानंतर माजी खासदार विलास मुत्तेमवार यांच्या नेतृत्वात प्रारंभी विकास ठाकरे ऑटोमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले. त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अर्ज सादर केला. यानंतर गिरीश पांडव यांनी समर्थकांसह अर्ज सादर केला. त्यानंतर सर्व नेते पुन्हा संविधान चौकातून निघालेल्या मिरवणुकीत सहभागी झाले.

यावेळी अनंतराव घारड, बबनराव तायवाडे, सुनील केदार, विशाल मुत्तेमवार, मध्य नागपूरचे उमेदवार बंटी शेळके, पूर्व नागपूरचे उमेदवार पुरुषोत्तम हजारे, गुड्डू तिवारी, संजय महाकाळकर, प्रशांत धवड आदी नेते व समर्थक उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या हातात काँग्रेसचे झेंडे तसेच ठाकरे यांचे कटआऊट्स होते. विकासभाऊ आगे बढोच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. पांडव समर्थकांपेक्षा ठाकरे समर्थकांची गर्दी  जास्त होती.

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने नामांकन अर्ज भरताना तरी काँग्रेस एकसंघ दिसेल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना असताना नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी, अनिस अहमद, अशोक धवड, विनोद गुडधे पाटील, गेव्ह आवारी, अभिजित वंजारी, तानाजी वनवे, प्रफुल्ल गुडधे, काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे आदी पक्षाचे प्रमुख नेते फिरकले नाहीत. यावेळी काँग्रेसचे मोठे नेते अनुपस्थित असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती.

कार्यकर्ते-पोलिसांमध्ये वाद

उमेदवारी अर्ज भरण्यास दोन्ही नेते आपापल्या समर्थकांसह जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले असता पोलिसांनी उमेदवार आणि प्रमुख नेत्यांना आत प्रवेश दिला. मात्र अन्य कार्यकर्त्यांना प्रवेशद्वारावर रोखण्यात आले. यामुळे तेथे धक्काबुकी झाली. कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वादावादी होत असताना मुत्तेमवार यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढत त्यांना बाहेर थांबण्यास सांगितले.

भाजपमध्ये गटातटाचे राजकारण सुरू झाल्यामुळे त्याचा फायदा काँग्रेसला होणार असून शहरात चांगल्या मताधिक्क्याने काँग्रेस चार उमेदवार जिंकणार आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची १ लाख ४० हजारावर मते वाढल्यामुळे त्याचा फायदा सहाही मतदारसंघात काँग्रेसला लाभ होणार आहे. पश्चिम नागपुरात काँग्रेसचे मताधिक्य वाढले आहे. त्यामुळे त्याचा फायदा होईल. मी चांगल्या मतांनी निवडून येणार आहे. पश्चिम नागपुरात गेल्या पाच वर्षांत जाहीर केलेली विकासकामे झाली नाहीत. त्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे. पश्चिममध्ये बंडखोरी होणार नसून सर्व पदाधिकारी व कायकर्ते माझ्यासोबत आहेत. – विकास ठाकरे, पश्चिम नागपूर उमेदवार

दक्षिण नागपुरात भाजपमधील अंतर्गत वाद आणि त्यांच्या पक्षाचे अनेक नगरसेवक व कार्यकर्ते संपर्कात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मतदारसंघात लोकांशी संपर्कात असून पक्षाचे कार्यकर्ते सोबत आहेत. त्यामुळे काँग्रेसचा विजय निश्चित आहे. – गिरीश पांडव, दक्षिण नागपूर उमेदवार