नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही रात्री १० वाजेनंतर फटाके उडवणाऱ्यांविरुद्ध उपराजधानीतील पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून शहरातील ६३ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली.  सर्वाधिक कारवाई जरीपटका ठाण्यांतर्गत झाली.

फटाक्यांच्या आतषबाजीमुळे दिल्लीसह अनेकशहरांमध्ये प्रदूषणाचे प्रमाणा वाढत असून दिवाळीतील आतषबाजीवर र्निबध आणण्याची विनंती करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. हा विषय गांभीर्याने घेत सर्वोच्च न्यायालयाने रात्रीच्या सुमारास ८ ते १० या कालावधीमध्ये फटाके फोडण्याची परवानगी दिली. त्यानंतर  फटाके फोडणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार राज्य सरकारने पोलिसांना सूचना दिल्या. पोलीस ठाण्याचे अधिकारीच नोडल अधिकारी नेमण्यात आले. याकरिता दंड किंवा अधिकाधिक आठ दिवसांच्या शिक्षेची तरतूद होती. त्यानंतर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सर्व पोलीस उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि पोलीस निरीक्षकांची बैठक घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यास सांगितले. प्रत्येक पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या क्षेत्रात रात्रभर गस्त घालून एकूण ६३ जणांवर कारवाई केली. सर्वाधिक २३ जणांवर कारवाई जरीपटका पोलिसांनी केली आहे. त्या खालोखाल सदर पोलिसांनी १४ जणांवर कारवाई केली.  काही जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले, तर काहींवर दंड  आकारण्यात आला. दरम्यान  पोलिसांनी काहींवर दंड ठोठावला. मात्र, मध्यरात्रीच्या नंतरही काहीजण फटाके उडवत होते. त्यांच्याविरुद्ध  गुन्हे दाखल केले.

मुलगा भाजला

जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या भागात  फटाके फोडतांना शंभराहून अधिक जण भाजले.  मेडिकलला दहा वर्षांच्या मुलाचा चेहरा भाजल्यामुळे त्यावर उपचार केले गेले.

अंकीत बारेकर (१०) असे मुलाचे नाव आहे. अनार पेटवताच तो जखमी झाला. सोबत येथे इतरही किरकोळ भाजलेल्या १३ रुग्णांवर उपचार झाले. तर या कालावधीत मेडिकलला अपघाताचे तब्बल ११६ रुग्ण आले. त्यातील ५० टक्के फटाक्यामुळे भाजले.  मेयोतही फटाक्यामुळे भाजलेल्या अवस्थेत एकूण १२ रुग्ण आले. दरम्यान शहरातील खासगी रुग्णालयांवर सुमारे ८० टक्के रुग्णांचा भार असतो. त्यामुळे अनेक रुग्णालयांतही या पद्धतीने भाजण्यासह अपघाताच्या रुग्णांवर उपचार झाल्याची माहिती वेगवेगळ्या भागातील डॉक्टरांनी दिली.

पोलीस कारवाई

ठाणे                   कारवाई

जरीपटका                    २३

सदर                            १४

अंबाझरी                      ०७

सीताबर्डी                      ०५

कळमना                        ०५

सक्करदरा                     ०४

गिट्टीखदान                    ०३

नंदनवन                        ०१

तहसील                        ०१

————————-

एकूण                           ६३